लालू प्रसाद यादव हे लोकनेते; शत्रुघ्न सिन्हांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 06:10 PM2018-03-24T18:10:21+5:302018-03-24T18:10:21+5:30
लालू प्रसाद यादव हे माझ्यासाठी कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच आहेत.
रांची: भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन पुन्हा एकदा पक्षनेतृत्त्वाला जुमानत नसल्याचे दाखवून दिले. तत्पूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात लालूंना सात वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लगेचच शत्रुघ्न सिन्हा यांनी रांचीच्या रिम्स रुग्णालयात जाऊन लालूंची भेट घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या लालूंवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या भेटीनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, लोकांची सहानुभूती लालू प्रसाद यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. लालू प्रसाद यादव हे माझ्यासाठी कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच आहेत. ते एक लोकनेते आहेत. आजची भेट ही केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.
चारा घोटाळ्यात न्यायालयानं लालूंना शिक्षा सुनावल्यानंतर काही वेळातच सिन्हा यांनी त्यांचे गोडवे गायल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही त्यांचा आत्मविश्वास कायम आहे हे पाहून मला बरं वाटलं, असेही सिन्हा म्हणाले. 'लालूंना उपचारासाठी 'एम्स'मध्ये दाखल करावे अशी मागणी काही लोक करताहेत. प्रकृतीत सुधारणा न झाल्यास त्यांना येथून हलवलं जाऊ शकतं,' असे सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.