शंकर भगवान समजलो, पण नितीश कुमार भस्मासूर निघाले - लालूप्रसाद यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 12:45 PM2017-07-27T12:45:43+5:302017-07-27T13:10:43+5:30
जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं असंही लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं
पाटणा, दि. 27 - 'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला', अशी टीका आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली, सोबतच नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. 'जेव्हा कधी वेळ आली तेव्हा नितीश कुमार यांना पुढे पाठवलं. जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं', असंही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी सांगितलं.
I put a tika on his forehead,said go rule the state, I had no greed in my heart, else why would I nominate him as Chief Minister: Lalu Yadav pic.twitter.com/A1csVqK1cP
— ANI (@ANI_news) July 27, 2017
'बिहार एक जागरुक प्रदेश असून, आज गावागावातील लोक नाराज असल्याचं', लालूप्रसाद यादव बोलले आहेत. यावेळी बोलताना आज आपल्या देशात सर्वांना एकत्र आणण्यासाठी एकही गांधी नसल्याची खंत असल्याचंही लालूप्रसाद यादव बोलले आहेत. 'नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन, नोकरीचं अमिष दाखवून ढोंग केलं', असल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला.
Nitish Kumar is huge opportunist. The mandate was against BJP, to throw out Modi-Shah out of Bihar. They said I was a beef eater: Lalu Yadav pic.twitter.com/Y1SBYdW4H2
— ANI (@ANI_news) July 27, 2017
'गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Hum boley Shankar bhagwan ki tarah jao, raaj karo, par yeh toh Bhasmasur nikla: Lalu Yadav about what he had said to Nitish Kumar earlier pic.twitter.com/d42sqB5Xpm
— ANI (@ANI_news) July 27, 2017
यावेळी बोलताना त्यांनी नितीश कुमार यांनी मातीत मिसळेन पण भाजपाशी हातमिळवणी करणार नसल्याचा दावा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. 'खोटी प्रतिमा उभी करुन नितीश कुमार यांचा पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून प्रचार करण्यात आला. माझी इच्छा असती तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं नसतं', असं लालप्रसाद यादव यांनी सांगितलं.
'अनेकदा नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही मॅच फिक्स होती', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. यावेळी बोलताना लालूप्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांवरही आगपाखड केली. 'अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्व मीडिया एकत्रित आला आहे. भारतात मात्र सगळी मीडिया विरोधकांशी लढत आहे. मीडियामधील मोठ्या घराणांचा यात दोष आहे. अमित शहा जे ठरवतात तोच अजेंडा छापला जातो', असा आरोप त्यांनी केला.