नितीशने पॉलिटिकल सुसाईड केलं- लालूप्रसाद यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 10:23 AM2017-07-29T10:23:52+5:302017-07-29T10:25:36+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आणि सत्ताधारी जनता दल(यू) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील महायुती अखेर 20 महिन्यानंतर तुटली.
मुंबई, दि. 29- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आणि सत्ताधारी जनता दल(यू) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील महायुती अखेर 20 महिन्यानंतर तुटली. नितीश कुमार यांनी भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. नितिश कुमार यांनी भाजपमध्ये जाऊन पॉलिटिकल सुसाईड केलं असल्याची टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. तसंच नितीश कुमार यांनी माझा विश्वासघात केल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणाले आहेत. इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार तसंच भाजपवर सडकून टीका केली आहे.
नितीश कुमार यांना मी नेहमीच कुठल्याही कामासाठी होकार दिला होता. एखादी गोष्ट त्यांनी विचारल्यावर मी त्यांना कधीही नकार दिला नाही उटल 'जा आणि राज्य कर' असं म्हणायचो. तसंच 'वेळ पडली तर मातीती जाऊ पण भाजपबरोबर जाणार नाही', असं नितीश कुमार सांगायचे. मग आता असं काय झालं की ते भाजपच्या मांडीवर जाऊन बसले? असा सवालही लालू प्रसाद यादव यांनी उपस्थित केला आहे. ज्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तोच पक्ष आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतो आहे. अशांनी आधी स्वतःकडे पाहावं, असा खोचक टोमणा लालूप्रसाद यादव यांनी लगावला आहे. नितीश कुमार यांच्यावर भ्रष्टाचारापेक्षा अत्याचाराचा गंभीर आरोप आहे. ते भारतीय दंड विधान 302 चे आरोपी आहेत. त्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. त्यामुळे जनता दल (यू) काही पोलीस स्टेशन नाही, स्पष्टीकरण द्यायला, असं लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. यापुढे वेळ आली तरी नितीश कुमार यांना बरोबर घेणार नाही,असं लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं आहे. इतर पक्षांनीसुद्धा नितीश कुमार यांना पुढे पक्षात देऊ नये, असा सल्लाही लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे.
याआधी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नितीश कुमार यांना भारतीय जनता पार्टीसोबत येण्याची ऑफर आली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे आधीच ठरविलं होतं, असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. दरम्यान,काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूच्या आमदारांनी एकत्र येऊन नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करावी असं यावेळी लालूप्रसाद यादव म्हणाले होते.