सत्ता जाताच लालूंची १० तास ईडी चौकशी, नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 06:30 AM2024-01-30T06:30:12+5:302024-01-30T06:30:52+5:30
Lalu Prasad Yadav: नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपच्या साथीने सरकार स्थापन करताच दुसऱ्याच दिवशी सोमवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली. लँड फॉर जॉब्स प्रकरणात लालूंची पाटणा येथील ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती.
- एस. पी. सिन्हा
पाटणा - नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपच्या साथीने सरकार स्थापन करताच दुसऱ्याच दिवशी सोमवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली. लँड फॉर जॉब्स प्रकरणात लालूंची पाटणा येथील ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती.
भारती यांनी सांगितले की, “जेव्हा तपास यंत्रणा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला चौकशीसाठी बोलावते तेव्हा आम्ही तिथे जाऊन त्यांना सहकार्य करतो आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना एकटे जाणे अवघड आहे, म्हणूनच जेव्हा ते कुठेही जातात तेव्हा कोणीतरी त्यांना सोबत घ्यावे लागते.”
संधीसाधूपणा सर्वोच्च शिखरावर : दिग्विजय
सत्तेसाठी संधीसाधूपणा शिगेला पोहोचला आहे. सर्वच संधीसाधू आहेत, मग ते भाजपमधील कोणीही असोत. त्यांना धार्मिक किंवा राजकीय विचारसरणीशी काही देणेघेणे नसून केवळ खुर्ची मिळविण्याची काळजी आहे, असा दावा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
‘इंडिया’ आघाडीवर कोणताही परिणाम नाही
जदयू सर्वेसर्वा नितीशकुमार महाआघाडीतून बाहेर पडल्यामुळे विरोधी गट ‘इंडिया’वर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त करत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ‘आया कुमार, गया कुमार’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली.