लालूंच्या कन्या मीसा भारती यांची मालमत्ता जप्त
By admin | Published: June 19, 2017 09:12 PM2017-06-19T21:12:58+5:302017-06-19T21:12:58+5:30
बिहारचे नेते आणि राष्ट्रीय जनता दल पार्टीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुलांच्या अघोषित मालमत्तेवर प्राप्तिकर विभागानं कारवाई केली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - बिहारचे नेते आणि राष्ट्रीय जनता दल पार्टीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुलांच्या अघोषित मालमत्तेवर प्राप्तिकर विभागानं कारवाई केली आहे. लालूंची कन्या आणि राज्यसभेची खासदार मीसा भारती यांची मालमत्ता प्राप्तिकर विभागानं बेनामी अॅक्टअंतर्गत जप्त केली आहे. त्यामुळे मीसा भारती आता स्वतःच्या मालमत्तेची विक्रीही करू शकणार नाहीत, तसेच त्यांना ती मालमत्ता भाडेतत्त्वावरही देता येणार नाही.
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, मीसा भारतीच्या 4 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. आर्थिक अनियमिततेमुळे मीसा भारती यांच्या मालमत्तेवर ही कारवाई करण्यात आली आहे. मीसा भारती बेनामी संपत्तीप्रकरणी आतापर्यंत दोनदा प्राप्तिकर विभागासमोर अनुपस्थित राहिल्या आहेत. तत्पूर्वी प्राप्तिकर विभागानं मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश यांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे बेनामी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारतींच्या अडचणीत वाढ झालीय. गेल्या काही दिवसांपूर्वी लालूंचे चिरंजीव तेज प्रताप यांच्या पेट्रोल पंपाचा परवानाही भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल)नं रद्द केला होता. तेज प्रताप यांनी चुकीच्या पद्धतीनं पेट्रोल पंपाचा परवाना मिळवल्याचा आरोप करत नोटीसही बजावण्यात आली होती.
8 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भारती यांचे सीए राजेश अग्रवाल याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेड्या ठोकल्यात. ईडीने राजेश अग्रवालला दिल्लीतील पटियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचं समोर आलं होतं. प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि गुरुग्राम येथे लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे छापे 1 हजार कोटींच्या बेनामी मालमत्तेच्या व्यवहाराच्या आरोपावरून मारण्यात आले होते. गेल्या 15 वर्षांत डझनांहून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली होती. नवी दिल्ली, गुडगावमध्ये लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित असलेली लोकं व कंपनी अशा जवळपास 22 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी प्राप्तिकर विभागानं ही कारवाई केली होती. 1 हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमिनीचा व्यवहार केल्याचा लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप आहे.