भूसंपादन विधेयक पुन्हा अधांतरी
By admin | Published: July 31, 2015 02:55 AM2015-07-31T02:55:40+5:302015-07-31T02:55:40+5:30
सध्याच्या स्वरूपातील भूसंपादन विधेयक संपल्यातच जमा आहे. भाजपाचे एस.एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वातील ३० सदस्यीय संयुक्त संसदीय समितीतील घडामोडींचे संकेत
नवी दिल्ली : सध्याच्या स्वरूपातील भूसंपादन विधेयक संपल्यातच जमा आहे. भाजपाचे एस.एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वातील ३० सदस्यीय संयुक्त संसदीय समितीतील घडामोडींचे संकेत तेच सांगतात. भाजपाची मूळ कल्पना असलेल्या या विधेयकात एकूण १६ प्रमुख दुरुस्त्या या संयुक्त समितीने सुचविल्या आहेत.
माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी होणारी बैठक अहलुवालिया यांनी लांबणीवर टाकली. आता ४ आॅगस्ट रोजीच्या बैठकीत अहवालाला अंतिम आकार दिला जाईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ आॅगस्ट रोजी तो सभागृहात सादर होईल. या समितीतील १६ सदस्यांनी सुधारणा सुचविल्या आहेत. काँग्रेस (५), तृणमूल काँग्रेस (२), बसपा, जेडीयू, राकाँ, माकप, वायएसआर, अण्णाद्रमुक, टीआरएस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याचा त्यात समावेश आहे. शिवाय, सध्याच्या स्वरूपावर बिजद व तेलुगु देसमचा असलेला आक्षेप वेगळाच. भाजपाच्या ११ आणि लोकजनशक्तीच्या एका सदस्यांचे समर्थन पाहता या समितीत भाजपाकडे बहुमत नाहीच. समितीतील सदस्यांच्या इच्छेनुसार सरकारची या वटहुकूमात महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी आहे, असे ग्रामीण विकासमंत्री वीरेंदरसिंग यांनी सांगितले आहे.