भू संपादन विधेयक शेतकरीविरोधी - अरविंद केजरीवाल
By admin | Published: February 24, 2015 04:19 PM2015-02-24T16:19:32+5:302015-02-24T16:23:40+5:30
केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेले भू संपादन विधेयक हे शेतकरीविरोधी असून केंद्रातील सरकार हे प्रॉपर्टी डिलरसारखे काम करीत असल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेले भू संपादन विधेयक हे शेतकरीविरोधी असून केंद्रातील सरकार हे प्रॉपर्टी डिलरसारखे काम करीत असल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. अण्णा हजारे यांनी भू संपादन विधेयकाविरुध्द जंतर मंतरवर पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर चौफेर हल्ला चढवला. केजरीवाल यांच्यासमवेत दिल्लीतील नवनियुक्त ६७ आमदारांची उपस्थिती होती. अण्णा हजारे हे आपले गुरू असून माझ्या वडिलांसारखे आहे असे सांगतानाच अण्णांच्या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा राहिल असे केजरीवाल यांनी सांगितले. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी त्यांनी घेतलेल्या काही शेतकरीविरोधी निर्णयामुळे त्यांना जनतेने नाकारले आहे . दिल्लीत भाजप सरकार शेतकरी, गरीबविरोधी निर्णय घेत असल्याचे सांगून भू संपादन विधेयक हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने त्याला आपण पूर्ण ताकदीनिशी विरोध करू असे केजरीवाल म्हणाले. मोदी सरकारने जे भू संपादन विधेयक आणले आहे त्या विधेयकांचा मोठ-मोठया उद्योगपतींनाच फायदा होणार असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. अण्णा हजारे हे आपल्याला गुरूस्थानी असून अण्णा यांनी सचिवालयात येवून तेथील अधिका-यांना मार्गदर्शन करावे अशी विनंती केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांना केली.