भूसंपादन विधेयक गरिबांसाठीच, अंबानींसाठी नव्हे - मोदी
By admin | Published: April 19, 2015 01:20 PM2015-04-19T13:20:45+5:302015-04-19T14:02:11+5:30
भूसंपादन विधेयक गरिबांसाठीच असून अंबानीसाठी नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - भूसंपादनाविरोधात गैरसमज पसरवले जात असून हे विधेयक गोरगरिबांसाठीच आहेत. अंबानी किंवा पत्रकारांसाठी घर बांधण्यासाठी आम्ही जमीन घेत नाही हे लक्षात ठेवा असे आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांंवर निशाणा साधला आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा खासदारांसाठी वर्कशॉप घेतला. यात मोदींनी सरकारच्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची सूचना केली. सरकारी योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे याकडे खासदारांनी लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. आमचे सरकार गोरगरिबांना समर्पित आहे, त्यांच्या विकासासाठीच आम्ही योजना राबवत आहोत, गरिबांना 24 तास वीज व हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे मोदींनी स्पष्ट केले.
काही लोकांना आमच्या सरकारचे कौतुक करणे आवडत नाही, त्यामुळे ते आता आमच्यासंदर्भात कधीही चागलं बोलत नाही, आम्ही केलेले चांगलं काम त्यांना दिसत नाही व चांगलं ऐकूनही घेत नाही असे सांगत मोदींनी विरोधकांवर निशााणा साधला. फ्रान्ससोबत झालेला नागरी अणू करार ही भारतासाठी सर्वात महत्त्वाची बाब असून मेक इन इंडियामोहिमेपेक्षाही हा करार महत्त्वाचा आहे असे मोदींनी सांगितले.