भूसंपादन विधेयक; रालोआत दुफळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2015 02:10 AM2015-07-02T02:10:17+5:302015-07-02T02:10:17+5:30
भूसंपादन विधेयकावरून रालोआत दुफळी निर्माण झाली आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने प्रस्तावित विधेयकातील
नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकावरून रालोआत दुफळी निर्माण झाली आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने प्रस्तावित विधेयकातील तरतुदींविरुद्ध लाल निशाण फडकवले आहे.
भूसंपादन विधेयक कायदा २०१३ मध्ये सुचविण्यात आलेल्या सुधारणा सध्या संसदेच्या संयुक्त समितीकडून अभ्यासल्या जात आहेत. या समितीने प्रत्येक परिशिष्टावर चालविलेली सल्लामसलतीची प्रक्रिया पुढील आठवड्यांत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कृषी जमीन संपादित करताना ७० टक्के शेतकऱ्यांची परवानगी बंधनकारक करण्यावर शिवसेनेने आधीपासून भर दिला आहे. शिरोमणी अकाली दलाने शेतकऱ्यांची एक इंचही जमीन विनापरवानगी घेतली जाऊ नये असा इशारा एस. एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वातील या समितीला लेखी निवेदनात दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी जमीन बहुमोल असून शेतकरी किंवा जमीन मालकाच्या संमतीविना एक इंचही जमीन सरकारने ताब्यात घेऊ नये, असे शिरोमणी अकाली दलाच्या नरेश गुजराल, बलविंदरसिंग भुंदेर, सुखदेवसिंग ढिंढसा, प्रेमसिंग चंदुमाजरा आणि शेरसिंग घुभय्या या पाच खासदारांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)