भूसंपादन पारित करणारच
By admin | Published: May 27, 2015 11:59 PM2015-05-27T23:59:47+5:302015-05-27T23:59:47+5:30
भूसंपादन विधेयकात शेतकरी, गरीब, गाव आणि राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या तर त्या मंजूर करण्यात येतील,
नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकात शेतकरी, गरीब, गाव आणि राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या तर त्या मंजूर करण्यात येतील, असे स्पष्ट करून भूसंपादन विधेयकासोबतच जीएसटी विधेयक संसदेत पारित करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
‘गाव, गरीब आणि शेतकरी यांना अनुकूल असलेल्या सूचना आल्या आणि त्या राष्ट्राच्या हिताच्या असल्या तर आम्ही लगेच त्या स्वीकृत करू,’ असे मोदी यांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते.
भूसंपादन विधेयकावरील कोंडी कायम असल्यामुळे सरकार विरोधकांची मतेही मान्य करणार काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. जीएसटी आणि भूसंपादन ही दोन्ही विधेयके संसदेच्या समितीकडे पाठविण्यात आली आहेत आणि ही विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पारित होतील, अशी सरकारला आशा आहे.
राज्यसभेत जीएसटी आणि भूसंपादन यांसारख्या महत्त्वाच्या विधेयकावरून कोंडी निर्माण झाल्यामुळे आर्थिक सुधारणांचा वेग मंदावला आहे काय, या प्रश्नाच्या उत्तरात मोदी म्हणाले, ही दोन्ही विधेयके देशाच्या हिताची आहेत. राजकारण बाजूला सारून सर्वच राजकीय पक्षांनी या विधेयकांची प्रशंसा करायला पाहिजे. राज्यांनी जीएसटी रचनेला सहमती दर्शविलेली आहे. जीएसटी विधेयक लोकसभेत पारितही झालेले आहे. आता ही दोन्ही विधेयके पारित होणे हा वेळेचा भाग आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
संपुआ सरकारच्या काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ह्या पंतप्रधान कार्यालयावर ‘वास्तविक’ शक्तीचा वापर करीत असणाऱ्या ‘घटनाबाह्य शक्ती’च्या रूपात कार्यरत होत्या; परंतु आता मात्र घटनात्मक मार्गानेच सरकार चालविले जात आहे, अशी टीका मोदी यांनी बुधवारी केली.
रालोआ सरकार संसदेत उघड अहंकार प्रदर्शित करीत आहे आणि हे सरकार केवळ एका व्यक्तीचे सरकार आहे, हा सोनियांचा आरोप फेटाळून लावताना मोदी म्हणाले, ‘याआधी खऱ्या अर्थाने घटनाबाह्य शक्ती सत्ता संचालन करीत होती व सोनिया गांधी ह्या कदाचित त्याचाच उल्लेख करीत असाव्यात. आता मात्र सत्तेचे संचालन घटनात्मक मार्गाने केले जात आहे. आम्ही घटनात्मक मार्गाने काम करीत आहोत
मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांवरही शरसंधान केले. यावेळी त्यांनी पीएमओमध्ये शक्ती केंद्रित होणे, अल्पसंख्याक, बिगर सरकारी संघटना, भूसंपादन आणि जीएसटी विधेयक, आर्थिक सुधारणा व अन्य अनेक मुद्यांवरील प्रश्नांची उत्तरे दिली.
पंतप्रधान कार्यालयात सर्व शक्ती केंद्रिभूत झाल्याच्या आरोपाबद्दल विचारले असता मोदी म्हणाले, ‘हा प्रश्न तेव्हा विचारला असता तर बरे झाले असते, जेव्हा एक घटनाबाह्य शक्ती घटनात्मक शक्तीवर बसलेली होती आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व शक्तींचा वापर करीत होती. पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालय हे पूर्णपणे घटनात्मक व्यवस्थेचा भाग आहेत.’
राहुल गांधी यांच्या ‘सुटाबुटातील सरकार’ या आरोपावर मोदी म्हणाले, वर्ष लोटले तरी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव अद्याप पचविता आलेला नाही. जनतेने काँग्रेसला तिच्या चुका व पापांबद्दल दंड दिला आहे. यातून काँग्रेस काही शिकेल, असे आम्हाला वाटले होते; पण तसे काही होताना दिसत नाही.