‘बुलेट ट्रेनसाठी जमीन ३० एप्रिलपर्यंत द्यावी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 01:26 AM2020-12-24T01:26:21+5:302020-12-24T01:26:48+5:30
bullet train : महाराष्ट्राकडून आवश्यक तितकी जमीन न मिळाल्यास मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने आवश्यक जमिनीपैकी फक्त २२ टक्के जमीन संपादित केली आहे. त्यामुळे उर्वरित जमीनही महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेऊन ती येत्या ३० एप्रिलच्या आधी प्रकल्पाकरिता सुपूर्द करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले.
महाराष्ट्राकडून आवश्यक तितकी जमीन न मिळाल्यास मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प २०२३च्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे मोदी सरकारने ठरविले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीत नुकताच घेतला.
या प्रकल्पासाठी लागणारी ठाणे व विक्रोळी येथील जमीनही महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर द्यावी तसेच वनखात्याच्या परवानगीची प्रक्रियाही जलद पार पाडावी असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधणीचे काम वेगाने मार्गी लागावे यासाठी गुजरात तसेच दादरा-नगरहवेली प्रशासनाने एक संयुक्त टास्क फोर्स नेमावा असा आदेशही पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे.