अयोध्येतील राममंदिर परिसरात भू-माफियांचा सुळसूळाट; भाजप आमदार आणि महापौरांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 02:47 PM2022-08-07T14:47:24+5:302022-08-07T14:48:26+5:30
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात भू-माफिया आणि अवैध धंदे सुरू झाले होते.
अयोध्या: अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होताच भूखंड माफिया आणि अवैध धंदे सुरू झाले होते. ही बाब समोर आल्यावर अयोध्या विकास प्राधिकरणाने बेकायदेशीर प्लॉटिंग करणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या बेकायदेशीर माफियांच्या यादीत अयोध्येचे महापौर आणि माजी आमदारांसह अनेक मोठ्या लोकांची नावे आहेत.
अयोध्या शहरातील बेकायदेशीर प्लॉटिंग आणि बेकायदेशीर वसाहत करणाऱ्या लोकांच्या नावांमध्ये अयोध्या महानगरपालिकेचे महापौर ऋषिकेश उपाध्याय, आमदार वेदप्रकाश गुप्ता आणि माजी आमदार गोरखनाथ बाबा यांच्यासह अनेकांच्या नावांचा समावेश आहे. त्यातही अशी अनेक नावं आहेत जी सत्तेत वरपर्यंत आपली ओळख ठेवतात. काही दिवसांपूर्वीच अयोध्येचे खासदार लल्लू सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बेकायदेशीर भूखंडाबाबत पत्र लिहिले होते.
अयोध्येत अवैध प्लॉटिंग आणि अवैध वसाहती सुरू झाल्या आहेत. राममंदिराचा निर्णय झाल्यापासून जमीन बळकावण्यात सत्तेतील लोकांचा प्रामुख्याने समावेश आहे. यात, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि मोठ्या कंत्राटदारांचा समावेश आहे. आता याप्रकरणी मोठी कारवाई होऊ शकते.