जमीन घोटाळा; हुडा यांना समन्स
By admin | Published: March 18, 2016 01:53 AM2016-03-18T01:53:48+5:302016-03-18T01:53:48+5:30
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी २०१५ मध्ये शेकडो खासगी कंपन्यांना वाणिज्य वापरासाठी जमिनीचे परवाने दिल्याप्रकरणी न्या. एस.एन. धिंग्रा यांच्या
गुडगाव : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी २०१५ मध्ये शेकडो खासगी कंपन्यांना वाणिज्य वापरासाठी जमिनीचे परवाने दिल्याप्रकरणी न्या. एस.एन. धिंग्रा यांच्या चौकशी आयोगाने तपासात सहभागी होण्याबाबत समन्स जारी केले आहे. हुड्डा २५ मार्च रोजी आयोगाच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत.
जमीन वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप असून स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफसारख्या खासगी कंपन्यांच्या सहभागामुळे विरोधकांनी तत्कालीन मुख्यमंत्री हुडा यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. मंगळवारी आयोगाने पाठविलेल्या समन्सनुसार हुडा यांचा जाबजबाब नोंदवून घेतला जाईल. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा हे स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीचे प्रवर्तक आहेत. (वृत्तसंस्था)
अधिकारीही चौकशीच्या घेऱ्यात...
गेल्या महिन्यात हरियाणाचे मुख्य सचिव दीपेंदरसिंग धेसी आणि काही खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. आयोगाने यापूर्वी निवृत्त आयएएस अधिकारी आणि हुडा यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन प्रधान सचिव आणि लोकसेवा आयोगाचे सदस्य छत्तरसिंग यांची चौकशी केली आहे.
सिंग यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातील नगर नियोजन विभागाच्या फाईल्सची जबाबदारी असायची. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर न्या. धिंग्रा यांच्या सल्ल्यावरून चौकशी आयोगाची व्याप्ती वाढविण्यात आली.