अयोध्येत कोट्यवधींचा जमीन घोटाळा, विकासाच्या नावाखाली हेराफेरी;अखिलेश यादव यांचा भाजपवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:23 PM2024-07-10T16:23:26+5:302024-07-10T16:27:09+5:30
अयोध्येत मोठा जमीन घोटाळा झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
अयोध्येतील जमिनी प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे. बाहेरच्या लोकांनी अयोध्येत येऊन मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली असून हे सर्व नफा कमावण्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा फायदा स्थानिकांना झालेला नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्या लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला. या मतदारसंघात समाजवादी पक्षाने ती जिंकली, यानंतर आता अखिलेश यादवअयोध्या मतदारसंघात लक्ष दिले आहे.
"पेगाससद्वारे माझा फोन हॅक झाला...", मेहबूबा मुफ्तींच्या मुलीचा भाजपवर गंभीर आरोप
अखिलेश यादव म्हणाले, 'जसे अयोध्येतील जमिनीचे व्यवहार उघड होत आहेत, तसं सत्य समोर येत आहे की, भाजपच्या राजवटीत अयोध्येबाहेरील लोकांना नफा कमावण्यासाठी जमीन खरेदी करण्यात आली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. भाजप सरकारने गेल्या ७ वर्षांपासून सर्कल रेट न वाढवणे हे स्थानिक लोकांविरुद्धचे आर्थिक षडयंत्र आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे जमीन घोटाळे झाले आहेत. येथे जमीन भूमाफियांनी विकत घेतली आहे.
अखिलेश यादव म्हणाले, 'अयोध्या-फैजाबाद आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना या सगळ्याचा काहीच फायदा झाला नाही. गरीब आणि शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी घेणे हा एक प्रकारचा जमीन बळकावणे आहे. अयोध्येत तथाकथित विकासाच्या नावाखाली झालेल्या हेराफेरी आणि जमिनीच्या व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे, असंही यादव म्हणाले.
अयोध्येतील जमिनीच्या किंमती झपाट्याने वाढल्या
अयोध्येत राम मंदिरामुळे, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक-खाजगी विकास पॅकेजमुळे जमिनीचे प्राइम रिअल इस्टेटमध्ये रूपांतर झाले आहे. अयोध्येतील जमिनीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून मार्च २०२४ पर्यंत जमीन रजिस्ट्रीची चौकशी करण्यात आली आहे. यामुळे अयोध्या आणि आसपासच्या गोंडा आणि बस्ती जिल्ह्यांतील किमान २५ गावांमध्ये जमिनीच्या व्यवहारांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. या जमिनी मंदिराच्या १५ किलोमीटरच्या परिघात येतात.