बापरे! एका मिनिटाला मोजावे लागतात 50 रुपये; मोबाईल सेवा बंद असल्याने नागरिक झाले त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 09:47 AM2019-09-25T09:47:09+5:302019-09-25T09:47:52+5:30
काश्मीर खोऱ्यात मागील 51 दिवसांपासून लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे
श्रीनगर - तंगमर्गमधील जहूर अहमद मीर मागील शुक्रवारी 38 किमीचा पल्ला पार करत एका मित्राच्या कार्यालयात श्रीनगर येथे पोहचले. अहमद मीर यांना त्यांच्या मुलाला कॉल करायचा होता. तो जम्मूतील एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. जहूर यांना एक फोन कॉल करण्यासाठी इतक्या लांब जाण्याची गरज यासाठी पडली कारण पट्टन येथील एका दुकानदाराने त्यांचा लँडलाइन वापरण्यासाठी एका मिनिटाला 50 रुपयांची मागणी केली, हे ऐकून त्यांना धक्का बसला.
काश्मीर खोऱ्यात मागील 51 दिवसांपासून लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. मोबाईल नेटवर्क बंद असल्याने लँडलाइनचा वापर करावा लागतो. अशातच ज्यांच्याकडे लँडलाइन आहे ते पैसे कमाविण्याची संधी सोडत नाही. अनेक ठिकाणी पीसीओ उघडण्यात आले आहेत. सामान्य लोकांकडून पैसे लुटण्याचे प्रकार सर्रासपणे होताना पाहायला मिळत आहे. बारामुल्लामधील पलहल्लन गावात राहणारे गुलाम हसन डार यांना बंगळुरुत आपल्या मुलाशी बोलण्यासाठी एका मिनिटाला 30 रुपये द्यावे लागले. त्यांनी सांगितले की, एक आठवडा झाला तरी त्यांचा मुलगा मुख्तारसोबत बोलणं होऊ शकलं नाही. याच कारण आहे की, मुलाचा आवाज ऐकण्यासाठी वडिलांना किंमत मोजावी लागते.
श्रीनगर येथील रैनावरीत राहणारे सईद अफजल नेहमी लाल चौकातील त्यांच्या मित्राच्या कार्यालयात जातात. त्यांची मुलगी शबाना आणि नातिनो या दिल्लीत वास्तव्य करतात. अफजल यांनी सांगितले की, मी माझा छोटा मुलगा अफरोजसोबत गेल्या 6 आठवड्यापासून बोललो नाही. तो दुबईत राहायला आहे. मोबाईल सेवा कधी सुरु होईल अन् जनजीवन सर्वसामान्य होईल याकडेच काश्मीर खोऱ्योतील लोकांचे लक्ष आहे. फोन कॉलच्या बदल्यात जास्त किंमत वसूल करण्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.
जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविल्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून काश्मीर खोऱ्यात मोबाईल सेवा, इंटरनेट यांच्यावर निर्बंध आणले आहेत. तसेच माध्यमांनाही जम्मू काश्मीरात वृत्तांकन करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात अनेक स्थानिक माध्यमांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काश्मीरमधील लोकांचा आवाज दाबला जातोय असा आरोप विरोधकांकडून सुरु आहे. कलम 144 लागू असल्याने अनेक ठिकाणी भारतीय जवान तैनात आहे.