अशी भाषा कुठलीही 'योगी' व्यक्ती बोलू शकत नाही, अखिलेश यादवांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 11:56 AM2021-02-27T11:56:54+5:302021-02-27T11:58:13+5:30
Akhilesh Yadav on Yogi Adityanath : केवळ समाजवादी पक्षच भाजपशी लढू शकतो, अखिलेश यादव यांचा दावा
लोकशाहीच्या मंदिरात विधानसभेत ज्या प्रकारे ठोकू, पटकून मारू अशा भाषेचा वापर केला, ती एका 'योगी' व्यक्तीची भाषा असू शकत नाही, असं म्हणत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. "अशा प्रकारच्या भाषेचा वापर सभागृहात केला जाऊ शकत नाही. त्यांनी लाहानपणापासूनच लाल मिर्चीचं सेवन केलं होतं असं वाटतंय. म्हणून त्यांना समाजवादी पक्षाच्या लाल टोपीची भीती वाचत आहे," असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
"लाल टोपी ही भावनांचं रंग आहे. आमचा आनंद आणि दु:ख यातूनच दिसून येतं. आम्ही हेदेखील म्हणू शकतो ज्या लोकांचं हृदय काळं असते ते लोकं काळी टोपी परिधान करतात," असंही अखिलेश यादव म्हणाले. अखिलेश यादव बुधवारी उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगींच्या विधानाचा संदर्भ देत होते, जेव्हा टोपी घातलेल्या नेत्याला मुलाला मुलानं गुंड समजलं होतं आणि सदस्यांना लाल, पिवळी, निळी, टोपी घालून लोकशाहीचं मंदिर घर नाटक कंपनीमध्ये बदलू नये असं म्हटलं होतं. सध्या लोकशाहीसाठी धोका निर्माण झाला आहे आणि केवळ समाजवादी पक्षच भाजपाशी लढू शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.
भाजपकडून खोटं आश्वासन
यावेळी त्यांनी कृषी कायद्यांवरही आपलं मत व्यक्त केलं. हे कायदे डेथ वॉरंट म्हणून सिद्ध होतील असंही ते म्हणाले. "भाजप राष्ट्रीय संपत्त्यांची विक्री करत आहे. सरकार तोट्यात आहे तर मोठ्या कंपन्या विकल्या जात आहेत. शेतीत नुकसान झालं तर देखील उद्योजकांच्या हाती सोपवलं जाईल का? शेतकऱ्यांना एमएसपी मिळालं नाही, यापुढी मिळणार नाही. भाजप खोटी आश्वासनं देत आहे," असंही यादव म्हणाले.