भाषेचा वाद आणखी पेटला; केंद्र सरकारचे तामिळनाडूला आव्हान, अमित शाह म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 09:05 IST2025-03-08T09:02:33+5:302025-03-08T09:05:01+5:30
भाषेच्या मुद्द्यावरून तामिळनाडूतील सत्तारूढ द्रवीड मुनेत्र कळघम (द्रमुक) आणि केंद्र सरकारदरम्यान पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली.

भाषेचा वाद आणखी पेटला; केंद्र सरकारचे तामिळनाडूला आव्हान, अमित शाह म्हणाले...
राणीपेट (तामिळनाडू) : भाषेच्या मुद्द्यावरून तामिळनाडूतील सत्तारूढ द्रवीड मुनेत्र कळघम (द्रमुक) आणि केंद्र सरकारदरम्यान पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली. तामिळ भाषेचा गौरव करताना या राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणही तामिळ भाषेत द्यावे, असे आव्हान शाह यांनी दिले.
सीआयएसएफ स्थापनादिनी कार्यक्रमात शाह बोलत होते. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने परीक्षेत उत्तरपत्रिका तामिळ भाषेत लिहिण्याची मुभा दिली आहे. आता तामिळनाडूत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्टॅलिन यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण तामिळ भाषेत सुरू करावे, असे माझे आवाहन आहे.’ तर भाजपमध्ये हिंमत असेल तर विधानसभा निवडणुकीत त्रिभाषेचा मुद्दा बनवून दाखवावा, असे आव्हान स्टॅलिन यांनी भाजपला दिले आहे.
स्टॅलिन म्हणाले...
अंगणवाडीचा विद्यार्थी पीएच.डीधारकांना समजावून सांगत आहे. केंद्राने आपल्यावर हिंदी लादली आहे. ही जबरदस्ती तामिळनाडू कधीही स्वीकारणार नाही. हे ब्रिटिशांच्या राजवटीसारखे आहे. शिक्षणमंत्र्यांनी तामिळनाडूला हिंदी स्वीकारा अशी धमकी दिली आहे. आता त्यांना उत्तर मिळेल. केंद्र सरकार अशा एका लढाईत अडकलेत की ते यात कधीही जिंकू शकत नाहीत. तामिळनाडू कुणापुढेही झुकणार नाही, असे स्टॅलिन म्हणाले.
तणाव कशामुळे?
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०च्या माध्यमातून केंद्र सरकार तामिळनाडूमध्ये हिंदीची सक्ती करीत असल्याचा द्रमुक सरकारचा दावा आहे. याचा केंद्र सरकारने स्पष्टपणे इन्कार केला आहे. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारने द्विभाषा धोरणाचा अवलंब करण्याचे जाहीर केले असून यानुसार तामिळ आणि इंग्रजी या दोनच भाषा स्वीकारण्याची घोषणा केली आहे.
तामिळनाडूचे कौतुक
शाह यांनी भाषणात तामिळनाडूने प्रशासकीय सुधारणा, आध्यात्मिक क्षेत्र, शिक्षण किंवा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये मोठे योगदान दिले असल्याचे नमूद केले. तामिळ भाषा, ही संस्कृती आणि परंपरा म्हणजे अमूल्य असा भारतीय वारसा असल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)