काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा, पंतप्रधान मोदी यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:59 AM2017-10-30T05:59:52+5:302017-10-30T06:00:35+5:30
काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या
बंगळुरु: काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या आशा-आकांक्षांशी फारकत झाल्याचे द्योतक आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली.
कर्नाटक दौ-यात बंगळुरू येथे भाजपा कार्यकर्त्यांपुढे केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, कालपर्यंत सत्तेवर असलेले अचानक पलटी खाऊन निर्लज्जपणे काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करू लागले आहेत. काश्मीरसाठी प्राणाहुती देणाºयांच्या हौतात्म्याचे राजकारण करणाºयांकडून देशाच्या विकासाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. काँग्रेसला याचा जाब द्यावा लागेल.
देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे ठामपणे सांगत पंतप्रधान म्हणाले की, हा देश सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे. सरदार पटेलांनी देशाची सुरक्षा आणि एकात्मता यासाठी अनेक निर्णय खंबीरपणे घेतले. काश्मीरसाठी हजारो युवकांनी प्राणांची आहुती दिली आहे. काश्मीरसाठी हौतात्म्य दिले नाही, असे देशात एकही राज्य नाही.
मोदी म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक हा संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण होता; पण काँग्रेसच्या ते पचनी पडले नाही. सर्जिकल स्ट्राइकने काँग्रेसला पोटशूळ का उठला हे आता त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. (वृत्तंसस्था)
जनतेपासून त्यांची नाळ तुटली
देशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांपासून काँग्रेसची नाळ तुटली आहे, असा दावा करत मोदी म्हणाले की, आपल्या शूर सैनिकांचा त्याग, भारताची प्रभावी राजनैतिक मुत्सद्देगिरी व भारताचे धाडस यामुळे डोकलामचा तिढा सुटला. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी भारत ठामपणे उभा राहतो हे त्यावरून दिसले. याबद्दल जग भारताकडे कौतुकाने पाहत असताना काँग्रेसवाले मात्र डोकलामवरून अपप्रचार
करीत आहेत.