मीडियाला गाडून टाकण्याची भाषा आक्षेपार्ह -न्या.काटजू
By admin | Published: September 11, 2014 11:10 PM2014-09-11T23:10:28+5:302014-09-11T23:10:28+5:30
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मीडियाला जमिनीत गाडून टाकण्याची आणि माना मोडण्याची केलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह असून लोकशाहीत ती स्वीकारार्ह ठरत नाही
नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मीडियाला जमिनीत गाडून टाकण्याची आणि माना मोडण्याची केलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह असून लोकशाहीत ती स्वीकारार्ह ठरत नाही, असे स्पष्ट करीत प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या.( निवृत्त) मार्कन्डेय काटजू यांनी राव यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
एका तेलगू टीव्ही वाहिनीने काही आमदारांबाबत अवमानजनक विधान केल्यानंतर राव यांनी जाहीरसभेत प्रसिद्धी माध्यमांवर कडाडून हल्ला चढविला होता. तेलंगण, तेलंगण विधानसभा किंवा तेलंगणच्या संस्कृतीचा कुणी अपमान करणाऱ्यांच्या माना मोडण्याची धमकीही दिली होती. न्या. काटजू यांनी निवेदन प्रसिद्ध करताना राव यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. टीव्ही वाहिनीने अपमानजनक शेरेबाजी केली असेल तर तेही अयोग्य आहे. प्रसिद्धी माध्यमांनी अशा प्रकारच्या विधानांपासून दूर राहावे.
जबाबदारीचे भान हवे- जावडेकर प्रसिद्धी माध्यमांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जबाबदारीचे भान ठेवावे. मीडिया जबाबदारीचे भान ठेवत असेल तर निश्चितच मीडियाचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विधानाचा एडिटर्स गिल्ड आॅफ इंडिया आणि न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन या दोन अग्रणी पत्रकार संघटनांनी स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करीत तीव्र निषेध केला आहे. राव आणि तेलंगणच्या सरकारने अलीकडे प्रसारमाध्यमांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल आम्ही चिंतित आहोत. राव यांचे विधान लोकशाही विरोधात आहे, असे एडिटर्स गिल्डचे अध्यक्ष एन. रवी यांनी म्हटले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)