लान्सनायक हनुमंतप्पांचे निधन
By Admin | Published: February 12, 2016 04:18 AM2016-02-12T04:18:59+5:302016-02-12T04:18:59+5:30
सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात बर्फाखाली गाडले गेलेले लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांची गत दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर गुरुवारी
नवी दिल्ली : सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात बर्फाखाली गाडले गेलेले लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांची गत दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर गुरुवारी संपली. गुरुवारी सकाळी ११.४५ वाजता या लढवय्या जवानाने अखेरचा श्वास घेतला.
हनुमंतप्पांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. हनुमंतप्पा राहत असलेल्या बेटादूर गावावर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह संपूर्ण देशाने हनुमंतप्पांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. गत दोन दिवसांपासून हनुमंतअप्पा यांचे प्राण वाचविण्यासाठी येथील आर्मी रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने शर्थीचे प्रयत्न चालवले होते. पण गुरुवारी हनुमंतअप्पांची प्रकृती आणखीच खालावली आणि ११.४५च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाने सांगितले होते. मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्याने शिवाय दोन्ही फुप्फुसांना न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती; याशिवाय त्यांच्या विविध इंद्रियांनीही काम थांबवले होते.
३ फेबु्रवारीला १९,६०० फूट उंचीवरील सियाचीनमध्ये हिमकडे कोसळल्यामुळे ‘१९ मद्रास बटालियन’चे १० जवान बर्फाखाली गाडले गेले होते. सियाचीनच्या बर्फाच्छादीत भागात बेपत्ता जवानांचा शोध घेणाऱ्या पथकाने बर्फ कापून चालविलेल्या शोधमोहिमेदरम्यान सोमवारी रात्री उशिरा हनुमंतअप्पा यांना जिवंत बाहेर काढण्यात आले होते. यानंतर लगेच त्यांना खास एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
कर्नाटकच्या धारवाडच्या बेटादूर गावात राहणारे हनुमंतअप्पा १३ वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते. लष्करातील आपल्या एकूण १३ वर्षांच्या सेवेपैकी सलग १० वर्षे त्यांनी अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात कर्तव्य बजावले. जोखमीच्या मोहिमांसाठी सतत सज्ज असलेला आणि उच्च ध्येयाने भारावलेला जवान अशी हनुमंतअप्पांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी महादेवी अशोक बिलेबन आणि दोन वर्षांची मुलगी नेत्रा असा परिवार आहे.
बेटादूर गावावर शोककळा
जिगरबाज हनुमंतप्पांच्या निधनाचे वृत्त धडकताच बेटादूर या गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. नातेवाईक, मित्रपरिवार, बेटादूर गावासोबतच आजूबाजूच्या गावांतील लोक आणि मीडियाने हनुमंतप्पांच्या घराकडे धाव घेतली.
हनुमंतप्पांची पत्नी महादेवी आपल्या दोन वर्षांची मुलगी व काही जवळच्या नातेवाइकांसह दिल्लीत आहे. हनुमंतप्पांचे अन्य कुटुंबीय मात्र गावातच आहेत. हनुमंतप्पांच्या निधनाची वार्ता ऐकताच त्यांना शोक अनावर झाला.
हनुमंतप्पा यांचा मृत्यू चटका लावून गेला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. हनुमंतप्पा गेले, पण त्यांच्यातील सैनिक अमर आहे. भारतमातेची सेवा करणाऱ्या तुम्हा शहिदांचा आम्हाला अभिमान आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान