शिवसेना देणार भाजपाला पाठिंबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:55 AM2018-04-27T00:55:21+5:302018-04-27T00:55:21+5:30
भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा व भाजपाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असल्याने ही जागा भाजपासाठी विशेष प्रतिष्ठेची असेल.
यदु जोशी।
मुंबई : लोकसभेच्या भंडारा-गोंदिया व पालघर या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. भाजपा नेतृत्वाने सन्मानाने चर्चा केल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पोटनिवडणुकीत भाजपाला पाठिंबा देतील, असे संकेत आहेत.
या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पाबाबत आपण ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी आधीच दिले आहेत.
भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा व भाजपाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असल्याने ही जागा भाजपासाठी विशेष प्रतिष्ठेची असेल. तसेच, पालघरची जागा राखण्यासाठीही भाजपा पूर्ण ताकद पणाला लावेल. अशा परिस्थितीत सेनेची मदत भाजपासाठी महत्त्वाची असेल. युतीमध्ये कितीही ताणतणाव असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले आहेत. युतीकरता शिवसेनेचा हात मागण्यास फडणवीस यांना पुढाकार घेण्यास भाजपा श्रेष्ठींकडून सांगितले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचा एकही आमदार नाही. मात्र, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना तीन मतदारसंघांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना जवळपास सव्वा लाख मते मिळाली होती. तथापि, भाजपाची मोठी परंपरागत व्होट बँक असलेला मतदारसंघ म्हणून भंडारा-गोंदियाकडे पाहिले जाते. पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा जागांपैकी भाजपाकडे दोन, शिवसेनेकडे एक तर हितेंंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वातील बहुजन विकास आघाडीकडे तीन आमदार आहेत. भंडारा-गोंदिया वा पालघरमध्ये स्वबळावर लढून जागा जिंकण्याइतपत ताकद शिवसेनेकडे नाही, हे याआधी त्यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आधारे स्पष्ट होते. तथापि, शिवसेना वेगळी लढल्यास त्याचा फटका भाजपाला बसू शकतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीही निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही युती व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न असेल. नाशिक, रायगड-सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जागांवर युती करून अन्य चार जागा शिवसेनेकडून भाजपाला सोडल्या जातील अशी शक्यता आहे. हिंगोली-परभणीच्या जागेवरही शिवसेना दावा करू शकते. मात्र, भाजपा शिवसेनेला फारतर दोन जागा सोडण्याच्या मानसिकतेत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.