देशात ठिकठिकाणी आगीचा भडका; नासाचा 'हा' फोटो धक्कादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 03:57 PM2018-04-30T15:57:49+5:302018-04-30T16:47:58+5:30
मध्य भारतातल्या आगीचं निशाण हे वणव्यांमुळे नव्हे, तर पिकं कापून झाल्यानंतर उरलेल्या तणाला लावलेल्या आगींमुळे दिसत आहे.
नवी दिल्ली- अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं गेल्या 10 दिवसांतील अवकाशातील फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्या फोटोंमध्ये भारतातल्या अनेक भागात आग लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह दक्षिणेकडच्या अनेक राज्यांमध्ये अशी आग लागल्याचं दिसत आहे. उन्हाळ्याचा दिवसांत वातावरणात कमालीचा उकाडा जाणवतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असून, कार्बनही उत्सर्जित होतोय.
भारतातल्या मोठ्या भागात दिसत असलेली आग ही जंगलात लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. परंतु नासाचे संशोधक हिरेन जेठवा यांच्या मते, मध्य भारतातल्या आगीचं निशाण हे वणव्यांमुळे नव्हे, तर पिकं कापून झाल्यानंतर उरलेल्या तणाला लावलेल्या आगींमुळे दिसत आहे. शेतकरी आता मशिननं पिकं कापत असल्यानं तण राहतात. जमीन पुन्हा सपाट करण्यासाठी हे तण जाळण्यात येतात. हे तण काढणं सोपं नसतं म्हणूनच ते जाळण्याचा पर्याय शेतकरी सर्रास वापरतात. हरियाणा आणि पंजाब ही राज्यांचं नव्हे, तर भारतातील अनेक राज्यांत अशा प्रकारे तण जाळली जातात. भात कापून झाल्यानंतर राहिलेली तण ब-याचदा गुरं खातात. ते गुरांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असल्यानंही ती जाळण्यात येतात. परंतु सध्या गव्हाच्या पिकांची कापणी झाल्यानंतर राहिलेलं तण जाळण्याचाही प्रकार जोर धरतोय.
नासाच्या सेटलाइटद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रात ज्या भागात आगीचे निशाण दिसत आहेत. त्यात गहू आणि भातशेतीचा समावेश आहे. पिकांना कापण्याचे दोन प्रकार प्रचलित आहे. एक तर शेतकरी स्वतः पिकं कापतात, तर दुस-या प्रकारात शेतकरी मशिनचा वापर करतात. परंतु मजुरांच्या कमतरतेमुळे सध्या तरी शेतकरी मशिनच्या वापराला जास्त प्राधान्य देतात. पिकांचं तण जाळण्याच्या विषयावर अध्ययन करणा-या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस रिसर्चर रिधिमा गुप्ता म्हणाल्या, देशात मशिननं पिकांच्या कापणीला प्राधान्य दिलं जातंय. शेतक-यांना हातानं तण कापण्यापेक्षा आगीनं जाळून नष्ट करणं सोपं जातं. मजुरांकडून कापून घेणं हे मशिननं कापणी करण्यापेक्षा महागडं आहे. पिकांचे तण जाळल्यामुळे कार्बनचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतं. या आगीत मध्य प्रदेशमधल्या सिहोर जिल्ह्यातील जास्त चित्र आहेत.