विमानातून धातूचा मोठा तुकडा घरावर कोसळला; दिल्ली विमानतळावर इमरजन्सी लँडिंग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 10:10 PM2024-09-04T22:10:47+5:302024-09-04T22:11:57+5:30
याप्रकरणी DGCA ने चौकशीचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली :दिल्लीविमानतळावर उतरलेल्या विमानातून धातूचा तुकडा घरावर पडल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांना सूचना देण्यात आली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोमवारी संध्याकाळी दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची घोषणा करण्यात आली होती. विमानातील क्रू मेंबर्सना इंजिनमध्ये काही बिघाड आढळून आले होते. सुदैवाने आपत्कालीन लँडिंग यशस्वी झाली.
सोमवारी रात्री घरावर तुकडा पडला
DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत विहार पोलिस स्टेशनला सोमवारी रात्री 9:30 वाजता उडत्या विमानातून धातूचा एक मोठा तुकडा घरावर पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) दिली.
बहरीनच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
एटीसीच्या पुढील तपासात असे आढळून आले की, एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX 145 ने रात्री 8:48 वाजता बहरीनसाठी उड्डाण केले होते. चालक दलातील सदस्यांना इंजिनमध्ये काही बिघाड आढळून आला आणि रात्री विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवान विमानातील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. आता हा धातूचा तुकडे याच विमनाचा आहे की इतर काही आहे, याचा तपास केला जात आहे.
विमानात तांत्रिक बिघाड
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, 2 सप्टेंबर (सोमवार) एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX 145 मध्ये दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर इंजिनमध्ये समस्या आढळली. या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग दिल्ली विमानतळावरच करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.