दिल्लीतील संमेलनातून देशभर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव; महाराष्ट्रातून १०९ भाविक झाले होते सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 01:53 AM2020-04-01T01:53:21+5:302020-04-01T06:23:25+5:30
संमेलनात महाराष्ट्रातील १०९ भाविकांचा सहभाग होता
- नितीन नायगांवकर
नवी दिल्ली : दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण दिल्ली खेरीज देशाच्या अनेक राज्यांत पसरले असल्याची शक्यता समोर आली आहे. या संमेलनात सहभागी झालेल्यांपैकी काही जणांचे मृत्यू झाले आहेत. २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी उघड झाले असून आणखी २०० जणांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने या आजाराचा धोका आणखी वाढला आहे.
संमेलनात महाराष्ट्रातील १०९ भाविकांचा सहभाग होता. लागण झालेले शेकडो लोक विविध राज्यात परत गेले आहेत. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी आता त्यांच्याखेरीज त्यांच्या संपर्कात आलेल्या हजारो लोकांचा मागोवा घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याचे काम राज्यांना युद्धपातळीवर करावे लागत आहे. आयोजक मौलाना साद यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविलेला आहे. त्यांचा शोध सुरू आहे. तेलंगणात परत आलेल्या एक हजार लोकांपैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूत ४५ जण पॉझिटिव्ह
या धर्मसभेसाठी इंडोनेशियातून आलेले ८ धर्मप्रचारक परदेशी विमानसेवा बंद झाल्याने मायदेशी परत न जाता उत्तर प्रदेशच्या बिजनोर येथील एका मशिदीत मुक्काम करत असल्याची माहिती आहे. तामिळनाडूत १५०० जण परतले आहेत. त्यातील ११०० जणांना क्वारंटाइन केले आहे. ४५ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे अंदमान-निकोबार येथील २१ जण संमेलनात सहभागी झाले होते.
निमाजुद्दीन परिसरातील या इमारतीचा परिसर सील केला आहे. त्या भागातील १५४८ लोकांना तेथून हलविण्यात आले आहे.
त्यापैकी ४४१ संशयित कोरोना बाधितांना अनेक इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
लॉक डाऊनमध्ये हजारोंची गर्दी
लॉक डाऊन घोषित झाल्यानंतर मर्काझच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती असल्याचे पोलिसांना कळविले होते. त्यातील काहींना पोलिसांनी बाहेरही काढले. पण २६ मार्चला तब्बल २ हजार लोक याठिकाणी पुन्हा एकत्र आले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पोलिसांना संपर्क साधला, मात्र तोपर्यंत संपूर्ण देशातील वाहतूक बंद झालेली होती.
आसाम सरकारने २४९ जणांची यादी तयार केली आहे. मध्य प्रदेशातून एक हजारावरूनही अधिक भाविक या संमेलनात सहभागी झाले होते. तर हिमाचलमधून गेलेले १७ जण आता राज्यात परतले आहेत. आंध्र प्रदेशातून गेलेले ४० जण परतले आहेत. त्यांच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त हे पॉझिटिव्ह आढळले आहेत.