शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज पाहता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:41 AM2018-07-27T04:41:25+5:302018-07-27T04:41:39+5:30

सावल्यांचा रंगणार खेळ; रात्री पावणेअकरा वाजता ग्रहणाला सुरुवात

The largest lunar eclipse in the century can be seen today | शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज पाहता येणार

शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज पाहता येणार

Next

पुणे : देशातील सर्व खगोलप्रेमी याबरोबरच नागरिकांना आज शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण (२७ जुलै) पाहता येणार आहे. १ तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असणार असून, शुक्रवारी रात्री १०.४५ मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार आहे. मात्र, आपल्याकडील गेल्या काही दिवसांपासूनच्या पावसाळी व ढगाळ वातावरणाचा अडथळा दूर झाल्यास हे ग्रहण पाहता येणार आहे. ग्रहण कालावधी चार तास (तीन तास पंचावन्न मिनिटे) असल्याने हे सर्वांत मोठ्या कालावधीचे ठरणार आहे.
पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील मोठे ग्रहण असणार आहे. यानंतर पुन्हा ९ जून २१२३ मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल. जुलै महिन्यामध्ये सूर्य हा पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते. या ग्रहणादरम्यान चंद्र या सावलीतून जात असल्याने हे ग्रहण पाहायला मिळते. चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते. आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ सर्वांना पाहायला मिळणार आहे.
ग्रहणाविषयी अधिक माहिती देताना खगोलशास्त्रज्ञ प्रकाश तुपे म्हणाले, शुक्रवारी रात्री १0.४५ वाजता हे ग्रहण सुरू होईल. या वेळी चंद्र पृथ्वीच्या छायेत शिरेल. ११.५४ वाजता चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत प्रवेश करेल. त्यापुढे रात्री १ वाजता चंद्र हा पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत शिरलेला असेल. २.४३ मिनिटांनी दाट छायेतून तो बाहेर पडेल. ४.५९ मिनिटांनी तो पूर्णपणे पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडलेला असले. हे संपूर्ण चार तासांचे ग्रहण असेल. पृथ्वीच्या सभोवतालचे वातावरण योग्य असेल तर या ग्रहणाच्या काळात चंद्र हा तांबूस रंगाचा दिसेल. तर वातावरण दूषित असले तर चंद्र हा काळवंडलेला पाहायला मिळेल. हे ग्रहण कोणालाही पाहता येणे शक्य आहे. या ग्रहणाचे कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. या शतकातील हे मोठे ग्रहण असल्याने विद्यार्थी, खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंनी हे ग्रहण पाहण्याची संधी सोडू नये.

२७ जुलै २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे ‘सारोस’ चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वांत मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडांतून (युरोप, आफ्रिका, आशिया, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका) हे ग्रहण पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतातून ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.

Web Title: The largest lunar eclipse in the century can be seen today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.