शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:09 AM2018-07-24T04:09:15+5:302018-07-24T04:10:14+5:30
संपूर्ण भारतातून चंद्रग्रहण दिसणार
मुंबई : या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी, २७ जुलै रोजी रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी सुरू होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. चंद्रग्रहण ३ तास ५५ मिनिटे होईल. त्यातील खग्रास स्थिती एक तास ४३ मिनिटे दिसेल, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
२७ जुलैच्या रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येईल. म्हणजेच खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. त्यानंतर उत्तररात्री २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास प्रारंभ होईल. उत्तर रात्री ३ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्याने ग्रहण सुटेल. २७ जुलै रोजी चंद्र पृथ्वीपासून जास्त दूर ४ लक्ष ६ हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. तसेच चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जाणार आहे. त्यामुळे चंद्राला पृथ्वीच्या छायेतून भ्रमण करण्यास जास्त वेळ म्हणजे ३ तास ५५ मिनिटे एवढा वेळ लागणार आहे. खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटे एवढा वेळ दिसेल, असेही सोमण यांनी सांगितले.
२७ जुलैचे खग्रास चंद्रग्रहण हे या शतकातील ऐतिहासिक आहे. गेल्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० रोजी झाले होते. त्या वेळी खग्रास स्थिती १ तास ४७ मिनिटे दिसली होती. यापुढील शतकातील सर्वात मोठी खग्रास चंद्रग्रहणे ९ जून २१२३ व १९ जून २१४१ रोजी होणार असून त्या वेळी खग्रास स्थिती १ तास ४६ मिनिटे दिसणार आहे.
ग्रहणस्पर्श ते ग्रहणमोक्ष या कालावधीत प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या प्रत्यक्ष मूर्तीवर नानाविध सुक्तासहित जलाभिषेक करण्यात येईल. ग्रहणमोक्षानंतर स्नानविधी झाल्यानंतर पहाटे ४.१५ वाजता पहाटेच्या पूजेला सुरुवात होईल. महापूजेकरिता साधारण दीड तास अपेक्षित आहे. श्रींची पहाटेची मंगलआरती ५.३० ऐवजी ६ वाजता होईल. २७, २८ जुलै रोजी मंदिरातील उर्वरित नित्य कार्यक्रम नेहमीच्या वेळेप्रमाणे होतील.