अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा
By Admin | Published: March 7, 2017 04:06 AM2017-03-07T04:06:02+5:302017-03-07T04:06:02+5:30
भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला
अमृतसर : भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला आहे. हा देशातील सर्वांत मोठा तिरंगा असल्याचे सांगितले जाते. पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी या ध्वज स्तंभाचे उद्घाटन केले.
या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. रांचीतील ९१.४४ मीटर (३०० फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले आहे. सीमेपासून १५० मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने ३.५० कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली आहे. याबाबत बोलताना पंजाब सरकारचे मंत्री जोशी म्हणाले की, ही एक अशी योजना आहे, याचे स्वप्न आम्ही बघितले होते आणि ते प्रत्यक्षात आले आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात अद्यापही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष मंजुरी घेण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
पाकिस्तान अस्वस्थ
हा भारतीय ध्वज इतका उंच आहे की तो पाकिस्तानातील लाहोर शहरातूनही सहजपणे दिसू शकेल, असे सांगण्यात आले. या तिरंग्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता आहे.
मात्र तो भारतातच असल्याने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना तक्रार करायला जागाच नाही. त्यामुळे पाकिस्तानी ध्वजही असाच उंचावर फडकावण्याची चर्चा तिथे सुरू झाली आहे.