पोलिसांच्या प्रयत्नामुळे 'लष्कर-ए-तोयबा'च्या दहशतवाद्याचं आत्मसमर्पण
By admin | Published: November 4, 2016 03:12 PM2016-11-04T15:12:02+5:302016-11-04T15:12:02+5:30
लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला जम्मू काश्मीर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 4 - लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला जम्मू काश्मीर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उमर खालीक मीर उर्फ समीर असं त्याचं नाव असून उत्तर काश्मीरचा तो रहिवासी आहे. उमरने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. उमरने पाकिस्तानात शस्त्र प्रशिक्षण घेतलं असून, त्याने आत्मसमर्पण केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उमर खालीक मीर उर्फ समीर याला बारामुल्ला जिल्ह्यातील त्याच्या घरी पोलिसांनी घेरलं होतं, त्यानंतर त्याने आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलीस अधिक्षक हरमीत सिंह यांनी दिली आहे. शस्त्र प्रशिक्षण घेण्यासाठी मे महिन्यात उमर सीमारेषा पार करुन पाकिस्तानात गेला होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
'उमरविरोधात कोणताही गुन्हा नोंद नाही. आम्ही त्याला आत्मसमर्ण करण्याची संधी देण्याचं ठरवलं. घरमालकाकडून आम्ही त्याला आत्मसमर्पण करण्याचा संदेश पाठवला मात्र त्याने उत्तर दिलं नाही. त्यानंतर त्याला फोन करुन शस्त्र खाली ठेवल्यास गोळीबारी होणार नाही असंही कळवण्यात आलं. उमरने आपल्या वडिलांना भेटायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याच्या वडिलांना घरात पाठवण्यात आलं, त्यांच्यासोबत तो बाहेर आला आणि आत्मसमर्पण केलं', अशी माहिती हरमीत सिंह यांनी दिली आहे.
LeT terrorist Omar Khaliq arrested by Police in Sopore (J&K), huge cache of arms and ammunitions recovered from him pic.twitter.com/luOml62JY7
— ANI (@ANI_news) November 4, 2016
पोलिसांनी दरवेळी असं यश मिळत असं नाही. अनेकदा पोलिसांनी आवाहन करुनही दहशतवादी आत्मसमर्पण करत नाही. काही परदेशी दहशतवाद्यांसोबत उमर पाकिस्तानातून परतला होता. आम्ही त्यांची माहिती उमरकडून मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत असं हरमीत सिंह यांनी सांगितलं आहे. दरम्यान स्थानिक दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.