LOCवर पाक सेनेबरोबर दिसले लष्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी, भारतात अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 11:59 AM2019-01-04T11:59:16+5:302019-01-04T11:59:27+5:30
नवी दिल्ली- बऱ्याचदा पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा फायदा घेत दहशतवादी नियंत्रण रेषेवरून भारतात घुसतात. दहशतवाद्यांना भारतात घुसता यावे, ...
नवी दिल्ली- बऱ्याचदा पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा फायदा घेत दहशतवादी नियंत्रण रेषेवरून भारतात घुसतात. दहशतवाद्यांना भारतात घुसता यावे, यासाठीच पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याचंही अनेकदा निदर्शनास आलं आहे. आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सैन्याबरोबर लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी दिसल्यानं एकच खळबळ उडाली असून, भारतात हाय अलर्ट देण्यात आला आहे.
इतकंच नव्हे, तर राजोरी आणि पुंच्छ सेक्टरमध्ये स्नायपर्सही सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमधल्या भारताच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट देण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर लष्कर ए तैय्यबाचे दहशतवादी आणि पाकचे स्पेशल कमांडो मिळून राजोरी आणि पुंछमधल्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये हल्ला करण्याचा प्लॅन बनवत आहेत. तत्पूर्वी 30 डिसेंबरला भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला होता.
रविवारी (30 डिसेंबर) नौगाम विभारातील नियंत्रण रेषेवर लष्कराने पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीम (BAT) च्या कारवायांना सुरुंग लावताना दोन घुसखोरांना ठार मारले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानी BAT पथकाचा हल्ला परतवून लावला होता.
तसेच या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या दोन जवानांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता. या घुसखोरांना भारतात घुसण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून मदत देण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे मृतदेह पाकिस्तानने परत न्यावेत, असे आवाहन करण्यात येणार असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले होते.