लष्कराने काश्मीरमध्ये आणखी एका खतरनाक दहशतवाद्याचा केला खात्मा, डोक्यावर होते 10 लाखाचे इनाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 08:19 PM2017-09-26T20:19:37+5:302017-09-26T21:03:10+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा पथकांना यश आलं आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा पथकांना यश आलं आहे. लष्कर-इ-इस्लामचा प्रमुख अब्दुल कय्यूम नजरला मंगळवारी सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले. उरी सेक्टरमध्ये सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला. सुरक्षा पथकांना मिळालेलं हे मोठं यश आहे. 50 पेक्षा जास्त हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. मागच्या 17 वर्षांपासून अब्दुल नजर काश्मीर खो-यात सक्रीय होता.
उरीमधल्या लाचीपोरामधून घुसखोरीचा प्रयत्न करत असताना सुरक्षा पथकांनी त्याला कंठस्नान घातले. आज सकाळी नियंत्रण रेषेजवळ लाचीपोरा येथे सुरक्षा पथकांनी घुसखोरीचा कट उधळून लावला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला अशी माहिती बारामुल्लाचे एसएसपी इम्तियाज हुसैन यांनी दिली. काश्मीरमधील टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे त्याच्याकडे लष्कर-इ-इस्लाम पुर्नजिवित करण्याची जबाबदारी दिली होती.
हिजबुल मुजाहिद्दीनमधून फुटून बाहेर पडलेल्या लष्कर-इ-इस्लामचे तो नेतृत्व करत होता. 43 वर्षीय अब्दुल नजर सोपोरचा राहणार होता. तो पाकिस्तानातही जाऊन आला होता. गावच्या सरपंचासह अनेक हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. वयाच्या 16 व्या वर्षापासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. काश्मीरमधल्या अनेक मोबाईल टॉवरवरील हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यामुळेच त्याला मोबाइल टॉवर हे टोपण नाव देण्यात आले होते.
J&K: Terrorist killed by security forces in general area Zorawar (Uri) earlier today identified as Lashkar e- Islam Chief Abdul Qayoom Najar pic.twitter.com/Z8MWm8Wilw
— ANI (@ANI) September 26, 2017