'तो' 20 वर्षांपासून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पत्र पाठवतो... आभार मानतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 03:18 PM2018-11-02T15:18:25+5:302018-11-02T15:22:00+5:30
'आमच्या गावातील अनेक जण १९९९च्या कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी, सलाम करण्यासाठी मी पहिल्यांदा पत्रं लिहिली.'
दहशतवादी हल्ल्यात भारताचा जवान शहीद झाल्याची बातमी आपल्या मनाला चटका लावून जाते. देशाचं संरक्षण करताना, म्हणजेच आपलं - आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी या वीरानं हौतात्म्य पत्करलंय, याची जाणीव आपल्याला असते. पण, या जवानांना मनातल्या मनात श्रद्धांजली वाहून आपण आपल्या कामात गढून जातो. काही दिवसांनी त्यांना विसरूनही जातो. मात्र, आपल्यातलाच एक जण गेली २० वर्षं शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पत्र पाठवतोय. देशाच्या रक्षणासाठी आपला जीवलग - नातलग गमावणाऱ्या परिवाराचे तो आभार मानतोय, जवानाच्या हौतात्म्याला वंदन करतोय. हे आगळं व्रत अंगिकारलेल्या व्यक्तीचं नाव आहे, जीतेंद्र कुमार गुज्जर.
'आमच्या गावातील अनेक जण १९९९च्या कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी, सलाम करण्यासाठी मी पहिल्यांदा पत्रं लिहिली. त्यानंतर, गेल्या २० वर्षांत जवळपास ४ हजार पत्रं मी पाठवली आहेत. त्यातल्या अनेक पत्रांना शहिदांच्या कुटुंबीयांनी उत्तरंही पाठवली. या कुटुंबीयांशी माझं वेगळं नातं निर्माण झालंय, काही जण तर मला मुलगाच मानतात. त्यांचं हे प्रेम पाहून मी सद्गदित होतो', अशा भावना जीतेंद्र कुमार गुज्जर यांनी व्यक्त केल्या.
जीतेंद्र कुमार हे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी. ते एका खासगी सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करतात. वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांवर जवान शहीद झाल्याची बातमी पाहिल्यानंतर ते त्या जवानाच्या कुटुंबाची माहिती मिळवतात आणि पत्र पाठवून त्यांना धीर देतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. पोस्टकार्डावर देशाचा तिरंगा काढून शेजारी 'सत्यमेव जयते' असं लिहून जीतेंद्र कुमार कुटुंबीयांच्या त्यागाला, त्यांच्या धाडसाला सलाम करतात.
शहीद जवानांच्या विविध नोंदी ठेवण्यासाठी जीतेंद्र यांनी एक रजिस्टरच तयार केलं आहे. ते आजपर्यंत सुमारे ५० शहीद कुटुंबीयांच्या घरी जाऊन आलेत. त्यांच्याकडून त्यांच्या घरची मातीही त्यांनी आणलीय. या मातीचा वापर करून एक शहीद स्मारक उभं करण्याचा त्यांचा मानस आहे. जीतेंद्र कुमार हे कार्य अनोख्या देशप्रेमाचं, देशभक्तीचंच द्योतक आहे.