गेल्या ५ वर्षात १ कोटींपेक्षा अधिक झाडे कापण्यात आली; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 08:34 AM2019-12-03T08:34:44+5:302019-12-03T08:35:37+5:30
दरम्यान, झाडे आणि त्यांच्या आधारे वाढलेली जैविक विविधता हाच खरा कोट्यावधी वर्षे झालेला विकास आहे.
नवी दिल्ली - देशभरात होणाऱ्या विविध विकासकामांसाठी कोट्यावधी वृक्षतोड असते. अलीकडेच मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बनविण्यासाठी रातारोत झाडे कापली गेली. अनेक पर्यावरण आणि वृक्षप्रेमींनी याला विरोध केला, पर्यावरणाचा ऱ्हास करुन विकास करु नये अशी मागणी वारंवार होत असते.
मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत माहिती दिली की, गेल्या ५ वर्षात कमीत कमी १ कोटी ९ लाख झाडे सरकारच्या परवानगी कापण्यात आली आहेत. राज्यसभेत याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री बाबुल सुप्रीयो यांनी सांगितले, मागील ५ वर्षात १ कोटी ९ लाख ७५ हजार ८४४ झाडे कापण्यात आली. परंतु पर्यावरण रक्षणासाठी आम्ही १२ कोटी ६० लाख वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचीही माहिती दिली आहे.
तसेच वन संरक्षण अधिनियम १९८० च्या अनुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे की, विविध विकासकामांच्या प्रस्तावावेळी ज्या कारणास्तव झाडे कापली जात आहेत त्याच्या तुलनेत अधिक झाडे लावण्याचं काम हाती घेतलं जाईल. जेव्हा विकासकामं होत असतात तेव्हाच आवश्यक असेल तरच झाडे कापली जातात असंही पर्यावरण मंत्री बाबुल सुप्रीयो यांनी सांगितले.
दरम्यान, झाडे आणि त्यांच्या आधारे वाढलेली जैविक विविधता हाच खरा कोट्यावधी वर्षे झालेला विकास आहे. ज्यामुळे आपण अस्तित्वात आलो. म्हणून झाड तोडून होणारी कोणतीही गोष्ट विकास असू शकत नाही. मुंबई, न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, शांघाय हा विकास नाही, ती मानवजातीचे अस्तित्व पृथ्वीवरून पुसून टाकत असलेली विनाशाची प्रक्रिया आहे. आकलनाच्या मानसिक गुंत्यातून मानवजात तात्काळ बाहेर पडली नाही, तर पूर्ण उच्चाटन अटळ आहे असं मत पर्यावरण तज्ज्ञ डॉ. गिरीश राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात ठाणे येथील तीन हात नाका येथे मेट्रोच्या ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या वृक्षतोडीवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महापौर नरेश म्हस्के यांनी या विषयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वृक्षप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील यांनी ठेकेदार व मेट्रोच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. आरे मेट्रो कारशेडसाठी झाडे कापली गेली त्यावेळी अनेक पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केली.