वधू लग्नमंडपात बसलेली असताना नवरदेवाने दिला नकार! लग्न मोडतोय म्हणून देऊ केले 4 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 10:15 AM2018-01-22T10:15:30+5:302018-01-22T10:20:58+5:30
महिलेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी वेल्लोर तुरुंगातील एका अधिका-याला अटक केली आहे. आर.सत्यामुर्ती असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चेन्नई - महिलेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी वेल्लोर तुरुंगातील एका अधिका-याला अटक केली आहे. आर.सत्यामुर्ती असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून शेवटच्या क्षणी त्याने लग्नाला नकार दिल्यामुळे निराश झालेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. सत्यामुर्ती आणि महिलेचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सत्यामुर्तीच्या कुटुंबाकडून त्यांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. घरच्यांचा विरोध असूनही सत्यामुर्ती लग्नासाठी तयार झाला होता.
19 जानेवारीला कातपाडी मुरुगन मंदिरात त्यांचा विवाह ठरला होता. वधू नटून विवाहासाठी तयार होऊन बसली होती. तिचे कुटुंबिय नवरदेवाची वाट पाहत असताना सत्यामुर्ती तिथे पोहोचला. माझ्या घरच्यांनी दुसरीकडे लग्न ठरवले आहे त्यामुळे मी लग्न करु शकत नाही असे त्याने सांगितले. सत्यामुर्तीच्या अशा वागण्याने मुलीसह तिच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला. नुकसानभरपाई म्हणून त्याने चार लाख रुपयेही देऊ केले.
घरी परतल्यानंतर मुलीने स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतले व ब्लेडने गळयावर वार केले. मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तिला लगेचच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती आता स्थिर आहे. सत्यामुर्तीबरोबर आपले चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाची सर्व तयारी झालेली असताना त्याने शेवटच्या क्षणी लग्नाला नकार दिला त्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलले असे महिलेने पोलिसांना सांगितले. फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सत्यामुर्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.