तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:35 PM2024-06-14T12:35:34+5:302024-06-14T12:37:25+5:30

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली.

last phone call of kuwait fire victim told children to study diligently then came death news | तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना

फोटो - आजतक

कुवेतमधील मंगाफ शहरात लागलेल्या आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ४५ भारतीय वंशाचे होते. मृतांमध्ये सर्वाधिक २४ जण केरळचे, पाच तामिळनाडूचे, तीन उत्तर प्रदेश, एक झारखंड आणि दोन जण बिहारचे आहेत. उत्तर प्रदेशातील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात गोरखपूरमधील दोन जणांचा समावेश आहे. एक गुलारियाचा जयराम गुप्ता आणि दुसरा गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जैतपूर उत्तरेतील रहिवासी अंगद गुप्ता. 

गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जटेपूर उत्तर येथील रहिवासी अंगद गुप्ता हे ९ वर्षांपूर्वी कुवेतला गेले होते आणि तेथील एका खासगी कंपनीत कॅशियर म्हणून कामाला होते. मंगफ शहरात गुरुवारी लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दूतावासातून आलेल्या फोनवरून हा प्रकार समोर आला आणि तेव्हापासून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आहेत.

"मन लावून अभ्यास करा..."

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली. मुलांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं, मन लावून अभ्यास करा असा सल्लाही दिला. सध्या या घटनेची माहिती मिळताच योगी आदित्यनाथ यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहण्याचे निर्देश राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. .

दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अंगद यांचे धाकटे भाऊ पंकज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह यापुढे कसा करणार हा प्रश्न पडला आहे. 

मुलीला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी 

कुटुंबीयांनी राज्य व केंद्र सरकारकडे मृतदेह सुखरूप परत आणावा तसेच कुटुंबातील मोठी मुलगी अंशिका हिला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. मृत अंगद गुप्ता यांच्या कुटुंबात पत्नी रीता देवी यांच्यासह मोठी मुलगी अंशिका गुप्ता, मुलगा आशुतोष गुप्ता आणि धाकटा मुलगा सुमित गुप्ता यांचा समावेश आहे.

मृतदेह पोहोचले भारतात 

कुवेतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे (IAF) विमान केरळमधील कोची विमानतळावर उतरलं आहे. कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकूण ४५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय वायुसेनेचे C-130J सुपर हर्क्युलस विमान कोची येथे उतरलेल्या भारतीयांचे मृतदेह परत आणण्यासाठी रवाना करण्यात आले. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत.
 

Web Title: last phone call of kuwait fire victim told children to study diligently then came death news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.