वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण सुरू; पाहा अद्भुत दृश्य LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 08:51 AM2019-12-26T08:51:16+5:302019-12-26T09:09:14+5:30
कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी
यंदाच्या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण दिसू लागलं आहे. देशाच्या बहुतांश भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात झाली आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आल्यानं विलोभनीय दृश्य दिसू लागलं आहे. गुजरातमधल्या द्वारका भागातून सर्वप्रथम ग्रहण दिसण्यास सुरुवात झाली. तामिळनाडू, केरळ, ओदिशा या भागात कंकणाकृती ग्रहण दिसू लागलं आहे. तर उर्वरित भारतात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे.
Tamil Nadu: Solar eclipse witnessed in Chennai pic.twitter.com/7cDz6NSgmc
— ANI (@ANI) December 26, 2019
पडद्यावर चंद्र-सूर्यामधील लपंडावाचा महासोहळा सुरू झाला असून त्याचं ‘मध्यांतर’ म्हणजे चंद्रानं सूर्याला जास्तीतजास्त झाकण्याची अवस्था सकाळी ९.२२ ला, तर शेवट (मोक्ष) सकाळी १०.५५ ला होणार आहे. हा खेळ सावल्यांचा दोन तास ५१ मिनिटे रंगणार आहे. सांगली, कोल्हापूरमधून हे ग्रहण ८४ टक्क्यांपर्यंत दिसेल. केरळ, कर्नाटक व तामिळनाडूतील काही भागांमधून ते पूर्णत: दिसत असून उर्वरित भारताच्या ग्रहणपट्ट्याच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील भागांतून मात्र ते ‘खंडग्रास’ दिसणार आहे.
सौदी अरेबिया, कतार, दक्षिण भारत व इंडोनेशिया येथील भूप्रदेशावरून ११८ रुंदीचा प्रतिछायेचा पट्टा जात असल्याने येथून सूर्यबिंब कंकणाकृती दिसेल. सूर्यग्रहणासाठी अमावास्येची तिथी (सूर्य-पृथ्वीच्या मध्ये चंद्र अशी स्थिती); शिवाय तीनही आकाशस्थ गोल सरळ रेषेत येणे गरजेचे असते. पृथ्वी-चंद्र हे गोल स्वयंप्रकाशित नसल्याने, सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या मोठ्या सावल्या अंतराळात सदोदित पडलेल्या असतात. जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, तेव्हा गडद सावलीच्या पट्ट्यातील लोकांना चंद्रबिंबाच्या आड सूर्य पूर्ण झाकलेला (खग्रास) दिसतो; तर विरळ पट्ट्यातून त्याचा काही भागच ग्रासलेला (खंडग्रास) दिसतो.
Gujarat: Solar eclipse witnessed in Ahmedabad. pic.twitter.com/EpUqIDWOpD
— ANI (@ANI) December 26, 2019
Solar eclipse witnessed in Dubai. #SolarEclipsepic.twitter.com/8x99OqAr5w
— ANI (@ANI) December 26, 2019
चंद्र पृथ्वीपासून दूर असताना त्याचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावास्येची तिथी व हे तीनही गोल सरळ रेषेत आले, तर ‘सूर्यग्रहण’ घडते; पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही. परिणामी, सूर्यबिंबाचा कडेचा भाग एखाद्या बांगडीप्रमाणे दिसतो. या खगोलीय घटनेस ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात.