पत्नीची शेवटची इच्छा म्हणून इंजिनिअरने महाकालेश्वर मंदिरात अर्पण केले तब्बल 17 लाखांचे दागिने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 07:27 PM2021-10-25T19:27:31+5:302021-10-25T19:30:03+5:30
Jewellery worth 17 lakhs : भगवान महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या दरवर्षी उज्जैनला यायच्या. रश्मी प्रभा या गेल्या महिन्याभरापासून आजारी होत्या.
नवी दिल्ली - उज्जैनमध्ये एका इंजिनिअरने आपल्या पत्नीचे तब्बल 17 लाखांचे दागिने महाकालच्या चरणी अर्पण केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरने हे दागिने अर्पण केले. झारखंडमधील बोकारो येथील इंजीनिअर संजीव कुमार हे आई सूरज प्यारीसोबत महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आणि त्यांनी दिवंगत पत्नी रश्मी प्रभा यांचे 17 लाखांचे दागिने मंदिर समितीला दिले अशी माहिती महाकालेश्वर मंदिर समितीचे सहाय्यक प्रशासक मूलचंद जुनवाल यांनी दिली. इंजिनिअर संजीव कुमार यांची पत्नी महाकालची भक्त होती.
भगवान महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या दरवर्षी उज्जैनला यायच्या. रश्मी प्रभा या गेल्या महिन्याभरापासून आजारी होत्या. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असं इंजिनिअर संजीव कुमार यांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. भगवान महाकाल यांच्या चरणी आपले सर्व दागिने अर्पण करावे, अशी शेवटची इच्छा रश्मी यांनी पती संजीव कुमार यांच्याकडे व्यक्त केली होती. संजीव कुमार यांनी पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. त्यांनी भगवान महाकाल यांच्या चरणी 310 ग्रॅम सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत.
सोन्याच्या दागिन्यांमध्ये एक तोळ्याचा सोन्याचा हार
सोन्याच्या दागिन्यांमध्ये एक तोळ्याचा सोन्याचा हार, एक छोटा हार, एक जपमाळ, दोन बांगड्या, दोन कंगन, चार जोडी कानातले टॉप्स, एक कुंडल आणि एका अंगठीचा समावेश आहे. यावेळी एएसपी अमरेंद्र सिंह, सहाय्यक प्रशासक पोर्णिमा सिंघी, मूलचंद जुनवाल, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आर. पी. गेहलोत हे उपस्थित होते. इंजिनिअर आईसोबत मंदिर समिती कार्यालयात पोहोचले होते. तिथे त्यांना प्रसाद दिला गेला. पण दागिने अर्पण केल्यानंतरच अन्न, पाणी किंवा प्रसाद घेऊ, असं ते इंजिनिअर म्हणाले.
पत्नीची इच्छा केली पूर्ण
महाकाल मंदिर समितीचे प्रशासक गणेशकुमार धाकड यांनी ही माहिती दिली. पत्नी स्वर्गीय रश्मी प्रभा ही भगवान महाकालाची भक्त होती. यामुळे भगवान महाकालना आपले आवडते दागिने अर्पण करण्यासाठी ती अनेक वेळा बोलली होती. यानुसार आपण पत्नीची इच्छा पूर्ण केली आहे, असं संजीवकुमार यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.