अद्भूत! रायपुरमध्ये १२ एकरवर पसरले आहे लता मंगेशकर गार्डन, मुर्तीची रोज केली जाते पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 05:49 PM2022-02-08T17:49:05+5:302022-02-08T23:27:28+5:30
रायपुरमध्ये १२ एकरमध्ये तयार केलेले लता मंगेशकर गार्डन आहे. त्यात लतादिदींची मुर्ती आहे अन् त्याची रोज पूजा केली जाते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नसल्या तरीही त्यांच्या आवाजाने त्या करोडो भारतीयांच्या मनात जिवंत आहेत. लता मंगेशकर आणि छत्तीसगडमधील रायपुर या ठिकाणाचा तसा काही संबंध नाही. पण हा संबंध आता निर्माण झाला आहे. रायपुरमध्ये १२ एकरमध्ये तयार केलेले लता मंगेशकर गार्डन आहे. त्यात लतादिदींची मुर्ती आहे अन् त्याची रोज पुजा केली जाते.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण रायपुरमधील रामदास अग्रवाल हे लतादिदींचे नीस्सीम चाहते आहेत. त्यांनी लतादिदींना आदरांजली वाहण्यासाठी एक बाग तयार केली. मुख्य म्हणजे या बागेत लता मंगेशकर यांची एक फोटोफ्रेमही आहे ज्यावर लतादिदींची सही आहे. जेव्हा ते लतादिदींना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या बागेतील लता मंगेशकर यांची मुर्ती असलेला फोटो दाखवला. ते गेल्या १५ वर्षांपासून लतादिदींचा वाढदिवस साजरा करत आहेत.
वेगवेगळ्या संस्था अन् फाऊंडेशनच्या प्रमुख पदांवर असलेले रामदास अग्रवाल यांनी लतादिदींकडे भेटण्याची इच्छा व्यक्त करत पत्र लिहिले होते. त्यानंतर ठरलेल्या वेळी ते त्यांच्या घरी पोहोचले. पण अचानक लतादिदींची तब्येत बिघडल्याने त्यांची भेटीची इच्छा अपूर्ण राहीली. रामदास अग्रवाल यांनी ते लतादिदींना भेटु शकले नाही याची खंत होती. अचानक ४-५ दिवसांनी त्यांचा फोन खणाणला. उचलताच पलीकडून एक सुमधुर आवाज आला. खुद्द लतादिदी फोनवर बोलत होत्या. त्यांनी रामदास अग्रवाल यांच्याकडे भेटू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पुढच्यावेळी भेटण्याचे आमंत्रणही दिले. पण कोरोनामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. रामदास अग्रवाल या आठवणींना उजाळा देत लता मंगेशरकांना शतश: वंदन करतात.