Lata Mangeshkar : 'भारतीय गानकोकिळा' म्हणत राज ठाकरेंच्या लतादीदींना हटके शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:16 PM2021-09-28T15:16:29+5:302021-09-28T15:18:42+5:30
Lata Mangeshkar : 'दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, 'भारतीय गानकोकीळा' लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!, असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे.
मुंबई - आपल्या दैवी आवाजाने अख्ख्या देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदी अर्थात लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) यांचा आज वाढदिवस. 25 हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या लतादीदी म्हणजे भारताला लाभलेलं अनमोल सूररत्न आहे. सन 1942 साली ‘किती हसाल’ या मराठी सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं आणि पुढे त्यांच्या जादुई आवाजानं जगभरातील संगीतप्रेमींना वेड लावलं. आज लतादिदीचा 92 वा वाढदिवस आहे. त्यामुळे, देशभरातील दिग्गजांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही लतादीदींना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
राज ठाकरेंनी स्वातंत्र्यपूर्व काळातील काही आठवणी जागवत लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड कलाकारांपासून ते देशाचे गृहमंत्री अमित शहांपर्यंत अनेक दिग्गजांनी लता दीदींना वाढदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, 'भारतीय गानकोकीळा' लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!, असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे. सन 1942 मध्ये जेव्हा अवघा भारत ब्रिटीशांना उद्देशून भारत छोडोचा नारा देत होता. तेव्हा, एका 13 वर्षांच्या मुलीने भारतीय सिनेसृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केलं.
दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, 'भारतीय गानकोकीळा' लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #भारतीय_गानकोकिळा#LataMangeshkarpic.twitter.com/R8AaSl1buy
— Raj Thackeray (@RajThackeray) September 28, 2021
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करणाऱ्या लतादिदी आज 92 वर्षांच्या झाल्या आहेत.