Lata Mangeshkar : ... तेव्हा लतादिदींनी धोनीला केली होती विनंती, 'माही'च्या होत्या फॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 12:43 PM2022-02-06T12:43:43+5:302022-02-06T12:51:16+5:30
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमसाठी स्पेशल कॉन्सर्ट करुन टीम इंडियासाठी लतादिदींनी निधी उभारला होता.
मुंबई - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आज वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. दिग्गज नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. लतादीदींच्या गाण्यांचे, सुरांचे जगभरात अब्जावधी चाहते होते. तसेच, लतादिदीही क्रिकेटच्या चाहत्या होत्या. त्यामुळेच, भारताने १९८३ साली जिंकलेल्या विश्वचषकापासून ते महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीपर्यंत त्यांचं क्रिकेटशी वेगळच नातं जोडलेलं होत.
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमसाठी स्पेशल कॉन्सर्ट करुन टीम इंडियासाठी लतादिदींनी निधी उभारला होता. तर, सचिन तेंडुलकर आणि त्यांचं नातं हे आई-मुलांच्या नात्यासारखंच होतं. त्यामुळेच, सचिनच्या इच्छेनुसार आणि आग्रहाखातर लतादीदी एक गाणं नेहमीच म्हणायच्या. तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा.... हे गाणं सचिनसाठी लती दिदींनी एका कार्यक्रमात गायलं होतं. तर, महेंद्रसिंह धोनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही लता दिदींनी आपल्या भावना ट्विट करुन व्यक्त केल्या होत्या.
सन २०१९ मध्ये धोनी निवृत्ती घेणार अशा अफवा सुरु झाल्या होत्या. त्यावर लता दीदींनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत “नमस्कार एम एस धोनी. तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असं माझ्या कानावर आलं आहे. कृपया तुम्ही असा विचार करु नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. निवृत्तीचा विचारही तुम्ही मनात आणू नका अशी माझी विनंती आहे”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं होतं.
२८ दिवसांपासून रुग्णालयात होत्या
भारतासह जगभरातील श्रोत्यांना अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर आज हरपला. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. लता दीदींच्या जाण्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. गेल्या २८ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
अंत्यसंस्कारासाठी पीएम मोदी मुंबईत
लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं मुंबईतील शिवाजी पार्क येथे दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर साडेसहा वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत.