PM Modi in RajyaSabha: ...तेव्हा लतादीदींच्या भावाला नोकरीवरून काढण्यात आलं होतं; मोदींनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:58 PM2022-02-08T14:58:54+5:302022-02-08T15:02:35+5:30
PM Modi in RajyaSabha: पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचा समाचार; राज्यसभेत विरोधकांवर शरसंधान
नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे. संघराज्याबद्दल घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार सांगत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. सरकारं अस्थिर करणं हेच काँग्रेसचं धोरण आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली.
पंतप्रधान मोदींनी गोव्याचं उदाहरण देत काँग्रेसला लक्ष्य केलं. 'सरदार पटेल यांनी हैदराबाद आणि जुनागढला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रणनीती रचली. तशीच रणनीती गोव्यासाठी रचली गेली असती, तर गोव्याला आणखी १५ वर्षे पारतंत्र्यात राहावं लागलं नसतं. पोर्तुगिजांचं अत्याचार सहन करावे लागले नसते. पण तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुंना जगातील त्यांची प्रतिमा महत्त्वाची वाटत होती. ती जपण्यासाठी गोव्यातील जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आलं,' असं मोदी म्हणाले.
राज्यसभेतील भाषणात मोदींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचाही उल्लेख केला. 'लता मंगेशकर यांचं कुटुंब गोव्याचं होतं. त्यांच्या कुटुंबाला कशी वागणूक देण्यात आली ते देशाला कळायला हवं. लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओमधून काढण्यात आलं. त्यांचा गुन्हा इतकाच होता की त्यांनी सावरकर यांच्यावरील कविता रेडिओवर सादर केली होती,' असं मोदींनी सांगितलं.
'रेडिओवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कविता सादर करण्यापूर्वी हृदयनाथ मंगेशकरांनी सावरकरांची भेट घेतली होती. त्यावेळी माझी कविता रेडिओवर सादर करून तुम्हाला तुरुंगात जायचंय का? असा प्रश्न सावरकरांनी त्यांना विचारला होता. मंगेशकरांनी याचा उल्लेख एका मुलाखतीत केला होता. हृदयनाथ यांनी सावरकरांची कविता रेडिओवर सादर केल्यानंतर पुढील ८ दिवसांत त्यांना कामावरून काढण्यात आलं,' असं मोदींनी संसदेत सांगितलं.