लग्न उशिरा; तरीही लग्नानंतरच मुलींच्या जीवनमानात बदल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:09 PM2023-04-12T12:09:12+5:302023-04-12T12:09:27+5:30
भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो.
नवी दिल्ली :
भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘वूमेन अँड मेन इन इंडिया २०२२’ अहवालानुसार, महिलांचे लग्नाचे सरासरी वय वाढले आहे. हे वय २०१७ मध्ये २२.१ होते, ते वाढून २०२० मध्ये २२.७ झाले आहे. असे असूनही, महिलांची स्थिती अजूनही अनेक प्रकरणांमध्ये विवाहित जीवनावर अवलंबून असते. लग्नानंतर नोकरदार महिलांची संख्या कमी होऊ लागते.
गाव आणि शहरात लग्नाच्या वयात फरक
देशातील शहरी आणि ग्रामीण पातळीवर लग्नाच्या वेळी महिलांच्या सरासरी वयात अजूनही तफावत आहे. तीन वर्षांपूर्वी शहरांमध्ये २३.९ आणि गावांमध्ये २२.२ वर्षे वयात महिलांची लग्ने होत होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांचे विवाह करण्याचे वय सरासरी २६ वर्षे आहे. तर सर्वांत कमी वयात (२१ वर्षे) पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे मुलींचे लग्न केले जाते. २०२० मध्ये दिल्लीमध्ये लग्नाचे वय सरासरी २४.४ वर्षे, मध्य प्रदेशमध्ये २१.८ आणि छत्तीसगडमध्ये २१.६ वर्षे होते.
जबाबदारीचे ओझे...
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे विवाहित महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग मर्यादित आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, देशातील १५-४९ वयोगटातील केवळ ३२% स्त्रिया लग्नानंतर घराबाहेर काम करतात. पुरुषांमध्ये हेच प्रमाण ९८ टक्के इतके आहे.
नोकरी नव्हे, लग्न हे स्थलांतराचे कारण
१९८१ ते २०१७ पर्यंत देशात महिला साक्षरतेचे प्रमाण ४०.५ टक्क्यांनी वाढले आहे, तर पुरुषांच्या बाबतीत ही वाढ केवळ २८.३ % होती. असे असूनही, केवळ ०.६ % महिला शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जातात, तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण ४.७% आहे. ‘भारतातील स्थलांतर २०२०-२१’ अहवालानुसार, केवळ ०.७% स्त्रिया नोकरी, चांगल्या संधी, व्यवसाय, कामाच्या ठिकाणी जवळ असणे किंवा बदलीमुळे स्थलांतर करतात, तर ८६.८ टक्के महिला लग्नामुळे स्थलांतरित होतात.
देशातील विवाहाच्या वेळी महिलांचे सरासरी वय