परीक्षेसाठी विद्यार्थी झाला लेट, मदतीला पोलीसच धावून आले थेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:33 PM2020-03-04T16:33:12+5:302020-03-04T16:36:22+5:30
परीक्षेला उशीर झाल्याने घाईघाईत निघालेल्या विद्यार्थ्याला वाराणसी पोलिसांनी मदत केली
वाराणसी - सध्या सर्वत्र दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा माहोल आहे. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशाताही दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यासोबत सीबीएससी बोर्डाच्याही परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड पाहायला मिळते. घरापासून परीक्षा केंद्र दूरवर असल्याने लवकरच विद्यार्थी आपलं घर सोडतात. मात्र, सीबीएससी बोर्डाची हायस्कुलची विज्ञान विषयाची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थ्यास उशीर झाला होता.
परीक्षेला उशीर झाल्याने घाईघाईत निघालेल्या विद्यार्थ्याला वाराणसीपोलिसांनी मदत केली. आपल्या गाडीवर बसवून 2 पोलिस शिपायांनी या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर पोहचवले. उत्तर प्रदेशच्या चोलापूर क्षेत्रातील अहिरौली येथील एशियन पल्बिक स्कुलमध्ये सीबीएससी बोर्डाची परीक्षा होत आहे. त्यासाठी, जयवीर विक्रम घरातून निघाला होता. मात्र, आपल्याला उशीर झाल्याचे लक्षात येताच, तो भांबावला. त्याचवेळेस तिथून जाणाऱ्या पोलिसांच्या बाईकला जयवीरने हात केला. त्यास पाहून बाईकवरुन जाणाऱ्या गोसापूर पोलीस ठाण्याच्या प्रदीप यादव आणि संतोष कुमार यांनी गाडी थांबवली. जयवीरने आपली व्यथा पोलिसांपुढे मांडताच, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यास गाडीवर बसवले. त्यानंतर, काही वेळातच एशियन पल्बिक स्कुल गाठले. यावेळी, भावुक झालेल्या जयवीरने दोन्ही पोलिस शिपायांच्या पाया पडून आशीर्वीद घेतले. तसेच, केलेल्या मदतीबद्दल आभारही मानले. तर, पोलिसांनीही चांगल्या मार्कांनी पास होण्याचा आशीर्वाद दिला.
दरम्यान, परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्यांनीही पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच, पोलिसांना सॅल्युट केला. सध्या, परिसरात पोलिसांच्या या तत्परतेचं मोठं कौतुक होत आहे.