बिहारच्या इस्कॉन मंदिरात लाठीचार्ज; चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 10:24 PM2024-08-26T22:24:22+5:302024-08-26T22:25:00+5:30
भाविकांमध्ये धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हा पाऊल उचलावे लागले.
गोकुळाष्टमीच्या सायंकाळी बिहारमधील इस्कॉन मंदिरात प्रचंड गर्दी उसळल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. श्रीकृष्णाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांमध्ये धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हा पाऊल उचलावे लागले.
या लाठीचार्जमध्ये अनेक भाविक जखमी झाले आहेत. सायंकाळच्या वेळी मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक आले होते. तर बाहेर गेटवरही मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. यामुळे जागा कमी पडू लागल्याने मंदिर प्रशासनाची तारांबळ उडाली. सर्व भाविकांना श्रीकृष्णाचे दर्शन करायचे असल्याने धक्काबुक्की सुरु झाली.
यामुळे मंदिरात गेलेले भाविक आतच अडकले व चेंगराचेंगरी सुरु झाली. यामुळे लोकांना बाहेर काढण्यासाठी बाहेर असलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत गर्दी पांगविली. आतमध्ये अडकलेले लोक एकमेकांवर पड़ले आणि त्यांना जखमाही झाल्या.
परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे समजताच अतिरिक्त पोलीस बळ बोलविण्यात आले. अंदाजापेक्षा जास्त गर्दी झाल्याने बंदोबस्त अपुरा ठरला होता. काही वेळाने पुन्हा दर्शन रांग सुरु करण्यात आली आहे.