हरयाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 05:35 PM2020-12-31T17:35:22+5:302020-12-31T17:39:11+5:30
Farmers Protest : ३०-४० शेतकरी बॅरिकेट्स तोडणं आणि राज्याच्या संपत्तीचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली हरयाणा पोलिसांच्या ताब्यात
नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत अनेकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या. राजस्थान आणि हरयाणाच्या सीमेवर असलेल्या शाहजहांपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या श्रीगंगानगरमधून आलेल्या तरूणांनी हरयाणापोलिसांकडून सीमेवर लावलेले बॅरिकेट्स तोडले आणि जबरदस्ती ट्रॅक्टर ट्रॉलिंना हरयाणा सीमेत नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे हरयाणा पोलीस प्रशासन आणि शेतकरी आंदोलक यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. यात अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या शांततामय वातावरणात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी एकत्र येत एक रणनीती आखली. यानुसार त्यांनी हरयाणाच्या सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडून जबरदस्ती अनेक ट्रॅक्टर्स हरयाणा सीमेत नेले. यानंतर हरयाणा पोलिसांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासन आणि हरयाणा सीमेत शिरलेल्या लोकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर काही वेळ या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला.
#WATCH किसान शाहजहांपुर में पुलिस बैरिकेडिंग को तोड़ते हुए राजस्थान-हरियाणा बाॅर्डर से हरियाणा में दाखिल हुए। pic.twitter.com/nuAj4XGurx
— ANI_HindiNews (@AHindinews) December 31, 2020
राजस्थान आणि हरयाणा पोलीस प्रशासनानं काही वेळानं सर्वांशी चर्चा करून वातावरण शांत केलं. त्यानंतर शेतकरी नेत्यांनीही सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. हरयाणा पोलिसांनी ३०-४० शेतकऱ्यांना बॅरिकेट्स तोडणं आणि राज्याच्या संपत्तीचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं.