लातूरला पाणी पोहोचवण्याचे बिल आकारणार नाही - सुरेश प्रभू
By Admin | Published: May 13, 2016 04:58 PM2016-05-13T16:58:12+5:302016-05-13T16:58:12+5:30
दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवण्यासाठी आकारण्यात आलेले बिल मागे घेणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवण्यासाठी आकारण्यात आलेले बिल मागे घेणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. मिरजेतून लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चार कोटी रुपयांचे बिल आकारले होते. ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते.
'जलपरी'च्या माध्यमातून आतापर्यंत रेल्वेने ६ कोटी २० लाख लिटर पाणी लातूरला पोहोचवले आहे. पाण्यासाठी बिल आकारण्याच्या रेल्वेच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी आता बिल मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
लातूरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर तातडीचा उपाय म्हणून १२ एप्रिलपासून दररोज मिरजेहून ५० रेल्वे वॅगनद्वारे २५ लाख लिटर पाणी पुरवले जात आहे. १२ मे पर्यंत ६ कोटी २० लाख लिटर पाणी आणण्यात आले आहे. यासाठी रेल्वेला दररोज १२.५० लाख रुपये खर्च येत आहे. मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात या खर्चाचा उल्लेख आहे.
लातूरला रेल्वेने मोफत पाणी देण्याची घोषणा रेल्वेमंत्री प्रभुंनी केली होती. या घोषणेचे स्वागत करत स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी पहिल्याच दिवशी जलपरीवर बॅनर लावून रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन केले होते. पश्चिम महाराष्ट्रातील मिरज येथे पाणी भरल्यानंतर ११ एप्रिलला पहिली पाणी एक्सप्रेस लातूरला रवाना झाली. १२ एप्रिलच्या मध्यरात्री ट्रेन लातूरमध्ये दाखल झाली.
मिरज ते लातूर एकूण अंतर ३४२ कि.मी.चे होते. लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी खास राजस्थान कोटा येथून ट्रेन मागवण्यात आली होती. सुरुवातीला पाणी एक्सप्रेसला १० डब्बे जोडलेले होते. प्रत्येक डब्ब्यामध्ये ५० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता होती. त्यामुळे पहिल्या काही फे-यांमध्ये प्रत्येकवेळी पाच लाख लिटर पाणी लातूरला पोहोचवण्यात आले.
लातूर शहराची लोकसंख्या चार लाखापेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागातील ९४३ गावांमध्ये १८ लाख लोकसंख्या आहे. अपु-या पावसामुळे लातूरमध्ये जलाशय, धरणे, नद्या आणि विहीरी आटल्या आहेत.
कसे पाणी पोहोचवले जायचे
पाणी एक्सप्रेस जिथे थांबायची तिथून पाच ते सात कि.मी.च्या अंतरावरील एका मोठी विहीर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली होती. ट्रेनमधून पाणी विहीरीपर्यंत पोहोचवण्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली होती. विहीरीमध्ये जमा होणारे पाणी तहानलेल्या भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर प्रशासनाने ७० टॅंकरची व्यवस्था केली होती. या सर्व टॅंकरची मिळून एकूण २२ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता होती.