पंतप्रधानांकडून ५ राज्यांत ‘विकसित भारत’चा प्रारंभ; ‘मोदी की गॅरंटीवाली गाडी’ करणार वंचितांची नोंदणी, तक्रारकर्त्यांना मिळते त्वरित मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 07:43 AM2023-12-17T07:43:37+5:302023-12-17T07:43:44+5:30
योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत, त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम आहे.
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या महत्त्वाकांक्षी विकसित भारत संकल्प यात्रेकडे वळले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांमध्ये यात्रेची सुरुवात करताना पंतप्रधानांनी सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लोकांशी संवाद साधला.
योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत, त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम आहे. पंतप्रधानांनी या बसेसला-मोदी की गॅरंटीवाली गाडी-असे म्हटले आहे.
या बसेसमध्ये (रथ) डिजिटल उपकरणे बसविलेली आहेत. ज्यांची तक्रार असेल त्यांना त्वरित मदत मिळते. केंद्राचे वरिष्ठ अधिकरी आणि इतर या रथाचा महत्त्वाचा भाग आहेत.
एका महिन्याच्या कालावधीत ही यात्रा ६८,२६७ ग्रामपंचायतींमधील २.५४ कोटी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तेथे केंद्र सरकारच्या योजनांच्या २ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी-मेरी कहानी, मेरी जुबानी-या उपक्रमांतर्गत अनुभव कथन केलेले आहेत.
बसेसची संख्या वाढणार
२५ जानेवारी २०२४पर्यंत देशभरातील ६.६४ लाख गावे आणि ४,००० पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पंतप्रधानांच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी १५०० बसेस आजवर कार्यरत होत्या.
आता ही संख्या १,७००वर गेली आहे आणि पुढील ७० दिवसांत ही संख्या २५००वर जाण्याची शक्यता आहे. विविध योजनांचा लाभ न मिळालेल्यांचीही नोंदणी यावेळी केली जाणार आहे.
५१ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी
आरोग्य शिबिरांमध्ये आजवर ५१ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, १० लाख आयुष्मान भारत हेल्थ कार्ड जारी करण्यात आले आहेत.
सात लाखांपेक्षा अधिक लोकांनी समाजासाठी काम करण्याची तयारी दर्शविली आहे आणि माय भारत व्हॉलिंटिअर या योजनेंतर्गत नोंदणी केलेली आहे.