जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 07:27 AM2024-02-25T07:27:32+5:302024-02-25T07:27:47+5:30

कृषी सोसायट्यांच्या ११ कोठारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

Launch of world's largest grain storage scheme by PM Narendra modi | जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ

जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सहकार क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ केला. ११ राज्यांतील प्राथमिक कृषी कर्ज सोसायट्यांच्या (पीएसी) ११ कोठारांचे उद्घाटन मोदी यांनी केले. या योजनेवर १.२५ लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत.

याच कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते आणखी ५०० सोसायट्यांच्या कोठारांच्या उभारणीसाठी कोनशिला समारंभही पार पडला. १८ हजार सोसायट्यांच्या संगणकीकरणाचे उद्घाटनही त्यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही याप्रसंगी भाषण झाले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ३० हजार सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण केले जाईल. ६५ हजार सोसायट्यांच्या संगणकीकरणास मंजुरी देण्यात आली असून त्यावर २,५०० कोटी रुपये खर्च होईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

गुजरातमध्ये  विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन
nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार-रविवारी गुजरातेत आहेत. यावेळी ते देशभरातील ५२,२५० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. आरोग्य, रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि पर्यटन या क्षेत्रातील प्रकल्पांचा त्यामध्ये 
समावेश आहे. 
nराजकोट (गुजरात), भटिंडा (पंजाब), रायबरेली (उत्तर प्रदेश), कल्याणी (पश्चिम बंगाल) आणि मंगलगिरी (आंध्र प्रदेश) येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे (एम्स) उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राजकोटमधील एका कार्यक्रमात हा उद्घाटन समारंभ होईल.

संत रविदास यांना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. संत रविदास यांच्या ६४७व्या जयंतीनिमित्त वाराणसीत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभाला मोदी यांनी हजेरी लावली. 
एक्सवर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटले की, ‘रविदास यांनी दिलेली समानता आणि सद्भावनेची शिकवण प्रत्येक पिढीला प्रेरित करते.
रविदास हे दलितांमध्ये विशेषत्वाने पूजनीय आहेत. परमेश्वर एकच असल्याची त्यांची शिकवण आणि भेदभावाला विरोध करणारे त्यांचे विचार मोठ्या समुदायास आकर्षित करतात.’
२७ रोजी मोदी केरळात
तिरुवनंतपूरम : येत्या २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळ दौऱ्यावर येणार आहेत. भाजपाच्या राज्य शाखेच्या पदयात्रेच्या सांगता समारंभास नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. 

आज आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचे उद्घाटन केले. या योजनेंतर्गत ७०० लाख टन धान्य साठवण क्षमता असलेले हजारो कोठारे व वखारी ५ वर्षांत उभारण्यात येतील. साठवण सुविधांअभावी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. आधीच्या सरकारांनी या समस्येकडे अजिबात लक्ष दिले नाही. आम्ही आता या समस्येची सोडवणूक करीत आहोत.
    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

Web Title: Launch of world's largest grain storage scheme by PM Narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.