भारतीय विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सर्वात छोट्या उपग्रहाचे प्रक्षेपण
By admin | Published: June 23, 2017 01:51 AM2017-06-23T01:51:01+5:302017-06-23T01:51:01+5:30
तामिळनाडूतील विद्यार्थ्यांच्या एका संघाने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात छोट्या उपग्रहाचे अमेरिकी
लोकमत न्यूज नेटवक
नवी दिल्ली : तामिळनाडूतील विद्यार्थ्यांच्या एका संघाने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात छोट्या उपग्रहाचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे वजन केवळ ६४ ग्रॅम आहे.
तामिळनाडूच्या पल्लापट्टी येथील रिफाथ शारुक या विद्यार्थ्याने नासासाठी जगातील सर्वात छोटा आणि हलका उपग्रह तयार केला होता. त्याचे प्रक्षेपण करून रिफाथ व त्याच्या सहकाऱ्यांनी जागतिक अंतराळ क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला. ‘कलामसॅट’ असे या उपग्रहाचे नाव आहे. भारताचे मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून ते ठेवण्यात आले होते. २१ जून रोजी नासाचे रॉकेट या उपग्रहासह अंतराळात झेपावल्यानंतर इतिहास घडला. प्रक्षेपणानंतर भारतीय विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. भारतीय विद्यार्थ्यांचा अंतराळ प्रयोग नासाने स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ होती.
थ्रीडी प्रिंट केलेल्या कार्बन फायबरची उपयुक्तता जोखणे हे या उपग्रहाचे मुख्य काम होते. ‘कलामसॅट’च्या मोहिमेचा कालावधी प्रक्षेपणानंतर २४० मिनिटांचा होता आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात त्याचे १२ मिनिटे संचलन करण्यात आले, असे रिफाथने सांगितले.
कार्बन फायबरद्वारे तयार करण्यात आलेल्या या उपग्रहात किरणोत्सर्ग (रेडिएशन) आणि तापमानाची पातळी मोजण्यासाठी सेन्सर्स लावण्यात आले होते. नासा आणि आय डुडल लर्निंगने अंतराळाशी संबंधित एका स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात शारुकच्या या उपग्रहाची निवड झाली होती. या स्पर्धेत ५७ देशांच्या संघांनी उपग्रहांचे विविध ८६ हजार डिझाइन्स सादर केले होते.