त्याच्यात डोकावण्याची तुमची हिम्मत कशी झाली? भर कोर्टात कोर्टात वकिलावर चिडले CJI चंद्रचूड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:38 PM2024-10-03T16:38:04+5:302024-10-03T16:55:25+5:30
सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी एका वकिलाला सर्वोच्च न्यायालयामध्ये चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळालं.
CJI DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासमोर पुन्हा एकदा वकिलाने अशी काही चूक केली की ते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. सरन्यायाधीश चंद्रचूड भर कोर्टात वकिलावर प्रचंड चिडले. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर युक्तीवाद करताना एका वकिलाने कोर्ट मास्टरांकडे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा तपशीलाची फेरतपासणी केल्याचा दावा केला. हे ऐकून सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड संतापले आणि त्यांनी त्या वकिलाला फैलावर घेतलं. सुप्रीम कोर्टात घडलेल्या या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
गुरुवारी सुनावणीदरम्यान,सरन्यायाधीश चंद्रचूड यांना कळले की एका वकिलाने कोर्ट मास्टरसह त्यांनी लिहिलेल्या निकालाची उलटतपासणी केली. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड संतापले आणि त्यांनी पूर्ण कोर्टात वकिलाला फटकारले. आज वकील कोर्ट मास्टरला त्यांच्या निकालाबद्दल विचारत आहेत, उद्या ते पर्सनल सेक्रेटरींनाही विचारतील की सरन्यायाधीशांनी काय करत आहेत, अशा शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संताप व्यक्त केला.
"कमी वेळेसाठी का असेना, मी इथला प्रमुख आहे. पुन्हा या गोष्टी करण्याचा कधी प्रयत्न करु नका. माझे कोर्टातील काही शेवटचे दिवस शिल्लक आहेत. मी कोर्टात काय लिहिलंय ते कोर्ट मास्तरांना विचारायची तुमची हिम्मत कशी झाली? कोर्ट मास्तरांची डायरी बघायची हिम्मत कशी झाली? मग उद्या तुम्हीही माझ्या घरी याल आणि माझ्या पर्सनल सेक्रेटरी किंवा स्टेनोग्राफरला विचाराल की मी काय करतोय. वकिलांनी त्यांची सर्व विवेकबुद्धी गमावली आहे का?" असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला.
यावर वकिलाने सांगितले की, कोर्ट मास्टरच्या डायरीत लवादाची नियुक्ती झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांच्या कोर्ट मास्टरला विचारले, "तुम्ही त्यांना काही बोललात का?" यावर कोर्ट मास्टर सरन्यायाधीशांनी काहीतरी सांगितले. यानंतरही न्यायमूर्ती चंद्रचूड शांत बसले नाहीत. ते पुढे म्हणाले की, "ते काहीतरी वेगळे सांगत आहे. अंतिम आदेश हाच आहे ज्यावर आम्ही स्वाक्षरी करतो. त्यामुळे असे विचित्र कृत्य पुन्हा करू नका."
दरम्यान, न्यायमूर्ती चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. गेल्या आठवड्यातच सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान Yeah म्हणणाऱ्या एका वकिलाला झापलं होतं. हे काही कॉफी शॉप नाही, मला या 'या, या, या शब्दाची खूप ऍलर्जी आहे. न्यायालयात असे शब्द वापरण्याची परवानगी देता येत नाही, अशा शब्दात सरन्यायाधिशांनी वकिलाला खडसावलं होतं.