राजधानीतील वकिलांचे कामबंद आंदोलन सुरूच; तारखा घेण्यासाठी जिल्हा न्यायालयांमध्ये गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 06:24 PM2019-11-07T18:24:57+5:302019-11-07T18:25:08+5:30
राजधानीतील सर्व सहा जिल्हा न्यायालयांमधील दहा हजार वकिलांनी सलग चौथ्या दिवशी कामबंद आंदोलन केले.
नवी दिल्ली : राजधानीतील सर्व सहा जिल्हा न्यायालयांमधील दहा हजार वकिलांनी सलग चौथ्या दिवशी कामबंद आंदोलन केले. तीन दिवस न्यायालयीन कामकाजाला फटका बसल्यानंतर गुरुवारी फिर्यादींना पुढच्या तारखा घेण्यासाठी वकिलांनी न्यायालय परिसरात येऊ दिले. पण पोलीस-वकील संघर्षावर पडदा पडण्याऐवजी दररोज त्याला नवे कंगोरे प्राप्त होत आहेत. दोन दिवसांपूर्वी साकेत जिल्हा न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून फिर्यादींना माघारी पाठविणा-या वकिलांनी त्याच ठिकाणी गुलाबाचे फूल देऊन फिर्यादींचे स्वागत केले. साकेतसह तीस हजारी, कडकडडुमा, रोहिणी, पटियाला हाऊस आणि द्वारका या सहाही जिल्हा न्यायालयांमध्ये आज वकिलांनी शांततापूर्ण आंदोलन करताना पोलीस व फिर्यादींना परिसरात येऊ दिले. साकेत न्यायालयात बुधवारी वकील आणि सर्वसामान्य नागरिकांमध्येही शाब्दिक चकमक उडाली होती. मात्र, आज वकिलांनी लोकांना कोर्ट रूममध्ये जाऊ दिले.
याशिवाय सुनावणीला हजर राहून पुढची तारीख घेण्यासाठी वकिलांनी स्वत: ऐवजी दुस-या व्यक्तीला न्यायाधीशांपुढे पाठविले, अशी माहिती ऑल डिस्ट्रीक्ट कोर्टस् बार असोसिएशनच्या समन्वय समितीचे महासचिव डी. एस. कसाना यांनी सांगितले. जवळपास एक हजार वकील व फिर्यादींसाठी जेवणाची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली. साकेतप्रमाणे पटियाला हाऊसमध्येही पुढची तारीख घेण्यासाठी सुनावणीला लोकांना आत येऊ दिले जात आहे. नवी दिल्ली बार असोसिएशचे अध्यक्ष आर.के. वाधवा यांनी आज पटियाला हाऊस न्यायालयात पोलिसांना आत येण्यापासून रोखले नाही असे सांगितले. तर तीस हजार न्यायालय परिसरात आत येणाºया प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा तपासणी स्वत: आंदोलक वकीलच करीत आहेत.
पोलिसांविरुद्ध याचिका
तीस हजारीतील घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करणा-या दिल्ली पोलिसांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये धरणे देणा-या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. यासोबतच प्रकरण न्यायालयात असतानाही सोशल मिडीयावर वकिलांविरुद्ध पोस्ट टाकणा-या अधिका-यांवरही कारवाईची विनंती करण्यात आली आहे.
१४० कैदी न्यायालयीन कोठडीत होते
तीस हजारी न्यायालय परिसरात २ नोव्हेंबरला घटना घडली, त्यादिवशी उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगर याच्यासह १४० कैदी न्यायालयीन कोठडीत होते, अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.